‘नो एन्ट्री’मध्ये आपले सहर्ष स्वागत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 11:21 PM2017-10-26T23:21:12+5:302017-10-26T23:23:32+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : शहरातील एकेरी वाहतूक सुरळीत करण्यात पोलिसांना यश आले आहे. मात्र, एकेरी वाहतुकीचा नियम मोडणाºया वाहन चालकांना आता दुहेरी दंड बसत आहे. नो एन्ट्रीच्या प्रवेशद्वाराजवळ न थांबता सावज हेरण्यासाठी पोलिस आतमध्येच उभे राहात असल्याने वाहन चालकांना आर्थिक भुर्दंड बसत आहे.
साताºयात गेल्या तीन वर्षांपासून एकेरी वाहतूक सुरू आहे. नागरिकांनाही आता एकेरी वाहतूक अंगवळणी पडली आहे. शहरात इन मीन दोन रस्ते आहेत. राजपथावर जाण्यासाठी एखाद्याला वळसा घालून जावे लागते. त्यामुळे अनेक वाहनचालक शॉर्टकट मारण्याचा प्रयत्न करतात. ज्या ठिकाणी प्रवेश बंद असतो. त्या ठिकाणी पोलिस नसल्यामुळे संबंधित वाहनचालक आपले वाहन घेऊन जात असतो. परंतु मध्येच कोठेतरी पोलिस उभे असतात. नेमका सावज सापडत असल्याने पोलिसांनाही याची सवय झाली आहे. मात्र, यामुळे वाहतुकीला शिस्त लावण्याचा मूळ उद्देश बाजूला राहात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. पोलिसांनी नो एन्ट्रीच्या प्रवेशद्वाराजवळच उभे राहावे, एकाही वाहन चालकाला तेथून सोडू नये. हळूहळू वाहन चालकांना शिस्त लागेल. मात्र, सावज पकडून आर्थिक भुर्दंड करण्यापेक्षा पोलिसांनी वाहतुकीची शिस्त लावावी, अशीही मागणी सातारकरांमधून होत आहे.
नो एन्ट्रीतून एखाद्या वाहन चालकाने प्रवेश केल्यास त्याला दुहेरी दंड केला जातो. एक नो एन्ट्रीतून प्रवेश केल्याचा आणि दुसरा परवाना नसल्याचा. दुपारच्या सुमारास पोलिस नसल्याचे पाहून अनेकजण नो एन्ट्रीतून आपले वाहन नेत असतात. यातून पोलिसांची क्रेनही सुटली नाही. शहरात ठिकठिकाणी लावण्यात आलेले नो एन्ट्रीची फलक केवळ नावापुरतेच उरले आहेत.