जिल्ह्याच्या सीमेवरच खड्ड्याने स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 04:22 AM2021-03-30T04:22:28+5:302021-03-30T04:22:28+5:30
मायणी : सातारा, सांगली व पुणे जिल्ह्यातून जाणाऱ्या मिरज-भिगवण राज्य मार्गावरील मायणी-दहिवडी राज्य मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे, तर ...
मायणी : सातारा, सांगली व पुणे जिल्ह्यातून जाणाऱ्या मिरज-भिगवण राज्य मार्गावरील मायणी-दहिवडी राज्य मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे, तर सांगली जिल्ह्यातून सातारा जिल्ह्यात प्रवेश करतानाच जिल्ह्याच्या सीमेवरील खड्ड्यात प्रवाशांचे स्वागत होत आहे. मात्र, तिन्ही जिल्ह्यांतून जाणाऱ्या या राज्य मार्गाला वेगवेगळे नियम कसे, असा प्रश्न वाहन चालक उपस्थित करत आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, सांगली सातारा व पुणे जिल्ह्याला जोडणारा मिरज-भिगवन हा राज्य मार्ग आहे. या मार्गावरून बारामती, अहमदनगर, सांगली या महत्त्वपूर्ण बाजारपेठा जोडलेल्या आहेत. त्यामुळे रोज शेकडो वाहने या मार्गावरून धावत असतात. मात्र, वाहनांचे नुकसान होत आहे. वाहन चालक पर्यायी मार्गाचा शोध घेत असल्याने वेळ व पैसा अधिक खर्च होत आहे.
राज्यमार्गावरील मोठ्या प्रमाणात सुरू असलेली वाहतूक व देशातील दक्षिण उत्तर राज्यांना जोडणारा महत्त्वपूर्ण राज्यमार्ग असल्याने, हा राज्यमार्ग केंद्राने स्वतःच्या ताब्यात घेतला. हा राष्ट्रीय महामार्ग होणार असल्याची चर्चा तीन, चार वर्षांपासून सुरू आहे. त्यामुळे सातारा सार्वजनिक बांधकाम विभाग या मार्गावर डागडुजी सोडले, तर इतर कोणताही मोठा खर्च टाकत नसल्याने, अनेक वर्षांपासून हा राज्यमार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे.
राज्य मार्गावरील जिल्हा हद्द, मायणी ते दहिवडी या सुमारे पस्तीस किलोमीटर अंतरावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे, तर सांगली जिल्ह्यातून सातारा जिल्ह्यात प्रवेश करतानाच मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या वाहन चालकांचा व प्रवाशांचे स्वागत खड्ड्यातच होत आहे. मोठे खड्डे पडल्याने वाहन चालकांना वाहन चालविताना मोठी कसरत करावी लागत आहे.
मिरज-भिगवण राज्यमार्ग सांगली सातारा व पुणे जिल्ह्यातून जात आहे. या मार्गावरील सांगली जिल्ह्यातील रस्त्याचा दर्जा अतिशय उत्तम आहे, तर नुकताच दोन महिन्यांपूर्वी मायणी ते विटा हा संपूर्ण रस्ता डांबरीकरण व सील कोट टाकून पूर्ण केला आहे. फलटण-बारामती हा रस्ताही चांगल्या दर्जाचा आहे. मात्र, सातारा जिल्ह्यातील मायणी, दहिवडी ते मोगराळे घाट हा सुमारे साठ किलोमीटरचा मार्ग अतिशय खराब झाला आहे.
चौकट
मायणी-दहिवडी राज्य मार्गावर चार वर्षांपासून मोठ्या प्रमाणात खड्डे पडत आहेत. प्रत्येक वर्षी त्याच त्याच खड्ड्यांवर शासनाकडून लाखो रुपयांचा खर्च केला जात आहे, तरीही एक-दोन महिन्यांत हे खड्डे पुन्हा स्वतःचे अस्तित्व दाखवत आहेत. त्यामुळे हा राज्यमार्ग संपूर्ण नव्याने होणे गरजेचे आहे.
२९मायणी-रोड
सांगली जिल्ह्यातून सातारा जिल्ह्यात मायणीजवळ प्रवेश करताना, याच खड्ड्यात प्रवाशांचे स्वागत होत आहे. (छाया : संदीप कुंभार)