भरतगाववाडीत माऊलींच्या पालखीच्या मानाच्या अश्वांचे स्वागत, दर्शनासाठी भाविकांची गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2022 05:53 PM2022-06-15T17:53:25+5:302022-06-15T17:54:19+5:30
भरतगाववाडी येथे दरवर्षीप्रमाणे या दिंडीचे आगमन होत असून, एक दिवस मुक्काम असतो
नागठाणे : वारकरी संप्रदायाचा तथा भागवत धर्माचा पाया रचणाऱ्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीच्या मानाच्या अश्वांचा मुक्काम मंगळवारी रात्री भरतगाववाडी येथे झाला. भरतगाववाडी येथे दरवर्षीप्रमाणे या दिंडीचे आगमन होत असून, एक दिवस मुक्काम असतो. १९० वर्षांच्या परंपरेनुसार चालत आलेल्या अंकली (ता. चिक्कोडी, कर्नाटक) येथील श्रीमंत शितोळे सरकार यांच्या दिंडीचे भरतगाववाडी जिल्हा परिषद शाळेत आगमन झाल्यानंतर गावातील भजनी मंडळ, ग्रामस्थांनी स्वागत केले.
गेली दोन वर्षे कोरोनाच्या महामारीमुळे वारीमध्ये खंड पडला होता. परंतु आज दोन वर्षांनंतर या मानाच्या अश्वांचे दर्शन घेण्यासाठी ज्येष्ठ मंडळी, अबाल-वृद्ध, तरुण वर्ग तसेच लहान मुलांनी एकच गर्दी केली. त्यानंतर ग्रामदैवत स्वयंभू देवस्थान श्री गणेशाच्या मंदिरापासून संपूर्ण गावामध्ये ‘ज्ञानबा तुकाराम’च्या जयघोषात या मानाच्या अश्वांची मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये गावातील भजन मंडळी, महिला, कार्यकर्ते अमर पडवळ, प्रकाश कणसे, सतीश घाडगे, निखिल मोहिते, प्रसाद निकम, आशिष काटकर, अनिकेत पुजारी, किशोर मोहिते, तसेच बरेच ग्रामस्थ सहभागी झाले होते.
दि. १० जून रोजी या मानाच्या अश्वांच्या दिंडींचे अंकली येथून देवाची आळंदीकडे प्रस्थान झाले. मजल दरमजल करीत मिरज, सांगलीवाडी, पेठनाका, वहागाव कऱ्हाड येथून भरतगाववाडी सातारा येथून दिंडीचा पुढील मुक्काम भुईंज तसेच पुढे सारोळा, शिंदेवाडी आणि पुणे जिल्ह्यामध्ये दोन मुक्काम करून, दि. २० जून रोजी देवाची आळंदी येथे शेवटचा मुक्काम होणार आहे. दि. २१ जून रोजी देवाची आळंदी पुणे येथून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसोबत हे दोन्ही अश्व जोडून तीर्थक्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान होणार असल्याचे दिंडीच्या विश्वस्तांनी सांगितले.