भाजपमध्ये उदयनराजेंचं स्वागतच : फडणवीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2018 11:26 PM2018-10-28T23:26:59+5:302018-10-28T23:27:34+5:30
सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांना उमेदवारी देण्याबाबत आमदारांच्या विरोधानंतर अनेक तर्क-वितर्क लढविले जात ...
सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांना उमेदवारी देण्याबाबत आमदारांच्या विरोधानंतर अनेक तर्क-वितर्क लढविले जात होते. दरम्यान, खासदार उदयनराजे भोसले भाजपच्या संपर्कात असल्याचीही चर्चा होती. याबाबत एका वृत्तवाहिनीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या प्रवेशाबाबत विचारले असता ते म्हणाले, ‘राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आता खासदार उदयनराजे भोसले यांच्यासाठी जागा आहे, असे वाटत नाही. ते जर भाजपमध्ये येण्यास उत्सुक असतील तर त्यांचे स्वागतच असेल, त्यांना नकार देण्याचा प्रश्नच नाही,’ असे प्रत्युत्तर यांनी दिले.
भाजपने पक्ष विस्ताराच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजघराण्यातील व्यक्तींना भाजपमध्ये घेण्याचा प्रयत्न गेल्या काही वर्षांत सुरू केला आहे. त्यातच खासदार उदयनराजे भोसले यांना सातारा लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी देण्यास राष्ट्रवादीच्या आमदारांनीच विरोध केल्यामुळे खासदार उदयनराजेंना उमेदवारी मिळणार किंवा नाही, याबाबत चर्चा सुरू आहे. जर खासदार उदयनराजे यांना उमेदवारी मिळाली नाही तर त्यांना आपल्या पक्षात घेण्यास कोणताही पक्ष उत्सुकच असेल, त्यामुळे ते कोणाकडे जाणार, हे फक्त ते स्वत:च सांगू शकतील, असे मतही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. उदयनराजेंना नाही म्हणण्याचा प्रश्नच येत नाही, असे सांगत उदयनराजेंसाठी भाजपचे दरवाजे उघडे असल्याचेच मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. खासदार उदयनराजेंसाठी कोणत्याही पक्षात संधी निर्माण होऊ शकते, याची राष्ट्रवादी काँग्रेसलाही जाणीव असल्यामुळे उमेदवारीबाबत कोणताही निर्णय एवढ्यात घेतला जाणार नाही. अंतिम टप्प्यापर्यंत उमेदवारी कोणाला द्यायची, हे गुलदस्त्यात ठेवण्याचा प्रयत्न होऊ शकतो.