शाब्बास... पॅनेलप्रमुख नव्हे, मतदारच देणार जाहीरनामा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:31 AM2021-01-04T04:31:37+5:302021-01-04T04:31:37+5:30
कोपर्डे हवेली : सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून मतदारांपुढे पॅनेलच्या माध्यमातून गावाचा विकास कसा करणार, याचा जाहीरनामा मांडला ...
कोपर्डे हवेली : सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून मतदारांपुढे पॅनेलच्या माध्यमातून गावाचा विकास कसा करणार, याचा जाहीरनामा मांडला जात आहे. मात्र, कोपर्डे हवेली (ता. कऱ्हाड) येथील काही युवकांनी ऑनलाईन फॉर्मच्या माध्यमातून गावातील प्रश्नांसंदर्भात ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया घेऊन दोन्ही गटांच्या उमेदवारांपुढे जनतेचा जाहीरनामा मांडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
कोपर्डे हवेली ही या जिल्हा परिषद गटातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असून पाच प्रभागांत १५ सदस्य निवडले जाणार आहेत. त्यासाठी दोन्ही गटांनी गत दोन महिन्यांपासून निवडणुकीची तयारी केली असून, या ठिकाणी दुरंगी लढत होणार आहे. काही प्रभागांत ‘काँटे की टक्कर’ होणार आहे. दोन्ही गटांनी तुल्यबळ असे उमेदवार देऊन ‘हम भी कम नहीं’ असेच वातावरण तयार केले आहे. दोन्ही गटांचा विकासाचा जाहीरनामा प्रसिद्ध होण्यापूर्वीच गावातील काही युवकांनी ‘गुगल’चा आधार घेऊन ऑनलाईन फॉर्मवर गावाचे प्रश्न मांडून त्यावर ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया मागविल्या आहेत. येणाऱ्या प्रतिक्रिया दोन्ही गटांच्या पॅनेलप्रमुख आणि उमेदवारांना देण्यात येणार आहेत.
जनतेच्या जाहीरनाम्यात कचरागाडी, प्रत्येक प्रभागात छोटे मैदान, गावातील अतिक्रमणे, व्यावसायिक गाळ्याची निर्मिती, मोठे आरोग्य केंद्र, बंदिस्त गटारे, कचऱ्याची विल्हेवाट, शेती प्रशिक्षण, सरकारी सुविधा मार्गदर्शन, सांडपाणी व्यवस्थापन, आदींसह इतर प्रश्न विचारले असून, अनेकांनी यावर प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. त्या प्रतिक्रिया दोन्ही गटांच्या पॅनेलप्रमुख आणि उमेदवारांना देण्यात येणार आहेत. गेल्या अनेक निवडणुकीत प्रत्येक पॅनेल पाच वर्षांसाठी आपले जाहीरनामे ग्रामस्थांपुढे मांडत होते; पण जनतेच्या अपेक्षांचा विचार आता दोन्ही गटांना करावा लागणार आहे.
- चौकट
मतदार जागृत; उमेदवारांना राहावे लागणार सतर्क
सत्ताधारी सिद्धेश्वर पॅनेल आणि विरोधकांचे हनुमान पॅनेल यांच्यात दुरंगी लढत होणार असून, जनतेच्या जाहीरनाम्यामुळे दोन्ही गटांना या महत्त्वाच्या प्रश्नांचा विचार करावा लागणार आहे. मतदार जागृत असल्याचे यामुळे दिसून येत असून पूर्वीच्या तुलनेत निवडून येणाऱ्या उमेदवारांना विकासकामांसाठी सतर्क राहावे लागणार आहे.