कोरेगावात आता सुसज्ज अग्निशमन यंत्रणा
By admin | Published: May 24, 2015 10:55 PM2015-05-24T22:55:02+5:302015-05-25T00:31:10+5:30
ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत निर्णय : विविध ११ विषयांना मंजुरी
कोरेगाव : ‘कोरेगावकरांच्या वाढत्या मागणीस अनुसरून अग्निशमन यंत्रणा, घंटागाडीसह मैला टाकी उपसण्यासाठी मड पंप घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याची अंमलबजावणी लवकरच केली जाईल,’ अशी माहिती सरपंच विद्या येवले आणि उपसरपंच मंदा बर्गे यांनी दिली. ग्रामपंचायतीच्या छत्रपती शिवाजी सभागृहात नुकत्याच झालेल्या मासिक सभेत वेगवेगळे ११ विषय मंजूर करण्यात आले. शहराच्या सर्वच वॉर्डात समान निधी वाटपाच्या सूत्राला मान्यता देण्यात आली. ग्रामविकास अधिकारी समाधान माने यांनी विषयपत्रिकेचे वाचन केल्यानंतर प्रत्येक विषयावर सकारात्मक चर्चा करून निर्णय घेण्यात आले. चर्चेत प्रदीप बोतालजी, दिलीप बर्गे, संतोष पवार, संजय पिसाळ, संतोष चिनके, राहुल बर्गे, महेश बर्गे, सुनील बर्गे, नीता बर्गे, मनीषा सणस, विनया निदान, रसिका बर्गे, प्रतिभा बर्गे, शीतल पिसे व डॉ. मनीषा होळ यांनी भाग घेतला.
व्यापाऱ्यांसह नागरिकांची अग्निशामक दलाची मागणी मान्य करण्यात आली असून, ग्रामपंचायतीने आता नव्याने पाणी टँकर खरेदी करून त्यावर लोंबर्डिंग पंप बसवण्याचा निर्णय घेतला आहे. या टँकरचा वापर अग्निशामक दलासाठी केला जाणार आहे. कचरा निर्मूलनासाठी घंटागाडी नव्याने खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला. सार्वजनिक तसेच खासगी मैला टाकी उपसण्यासाठी अत्याधुनिक मड पंप खरेदी केला जाणार आहे. स्मशानभूमींची दुरुस्ती व देखभाल, सार्वजनिक शौचालयांची दुरुस्ती, पाणीपुरवठा विभागासाठी जादा अश्वशक्तीचा विद्युत पंप, पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीतील गाळ काढणे, मोठमोठ्या गटारातील गाळ काढण्याचा निर्णय घेण्यात आला. (प्रतिनिधी)
प्रमुख ठिकाणी सीसीटीव्ही!
प्रमुख ठिकाणी सीसीटीव्ही!
ग्रामपंचायतीच्या ३० टक्केअपंग कल्याण निधीतून सायकली, कर्णबधिरांना मशीन औषधोपचार, शिलाईमशीन वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी सर्वच वॉर्डातील गरजू व अपंगाची यादी तयार केली जाणार आहे. शहराच्या सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा असा प्रमुख ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच सर्वच खातेदार व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना विमा योजनेचा लाभ देण्याबाबत चर्चा झाली. त्यासाठी रक्कम ग्रामपंचायत भरण्यास तयार असल्याचे सरपंच येवले व उपसरपंच बर्गे यांनी सांगितले.