खैर झाडांच्या तुकड्यांची टेम्पोतून वाहतूक करणारे दोघे ताब्यात,
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:41 AM2021-05-21T04:41:16+5:302021-05-21T04:41:16+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क उंब्रज : येथील चाफळ फाटा येथे रात्री गस्त घालणाऱ्या उंब्रज पोलिसांनी खैर जातीच्या झाडांचे तुकडे विनापरवाना ...
लोकमत न्यूज नेटवर्क
उंब्रज : येथील चाफळ फाटा येथे रात्री गस्त घालणाऱ्या उंब्रज पोलिसांनी खैर जातीच्या झाडांचे तुकडे विनापरवाना वाहतूक करणारा टेम्पो पकडला. या टेम्पोसह साडेसहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले. मुद्देमालासह संशयित आरोपींना पोलिसांनी वन विभागाच्या अधिकारी यांच्या ताब्यात दिले.
याबाबत उंब्रज पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, उंब्रज पोलीस ठाण्याचे कर्मचारी अभय भोसले, सचिन देशमुख, नीलेश पवार हे बुधवार, दि. १९ च्या रात्री गस्त घालत असताना त्यांना येथील चाफळ फाटा येथे टेम्पो (एमएच १२ पीक्यू ७०२५)ची त्यांनी तपासणी केली. यावेळी टेम्पोमध्ये त्यांना अंदाजे सहा टन खैर जातीचे झाडांचे तुकडे आढळून आले. ही वाहतूक वेल्हा (पुणे) येथून चिपळूणला केली जात होती.
याबाबत चालकाकडे परवाना आढळून आला नाही म्हणून पोलिसांनी टेम्पोचा चालक रतन किसन दारवटकर (वय ६३, रा. खामगाव (मावळ) मोगरवाडी, ता. हवेली जि. पुणे) तसेच लाकूड मालक ग्यानबा बळवंत पासळकर (६१, रा. आंबेड, ता. वेल्हा, जि. पुणे) यांना ताब्यात घेतले. खैराची बाजारभावाप्रमाणे किंमत दीड लाख रुपये होत असून याचा वापर कात करण्यासाठी केला जातो. तसेच वाहतूक करणाऱ्या टेम्पोची किंमत पाच लाख आहे. पोलिसांनी संबंधित लाकडाच्या तुकड्यांसह टेम्पो व संशयित आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी कऱ्हाड येथील वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिले आहे.