फलटणच्या पश्चिम भागात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:26 AM2021-06-24T04:26:09+5:302021-06-24T04:26:09+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क आदर्की : फलटण तालुक्याच्या पश्चिम भागात गेल्या काही दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. वीजपुरवठा सातत्याने खंडित ...
लोकमत न्यूज नेटवर्क
आदर्की : फलटण तालुक्याच्या पश्चिम भागात गेल्या काही दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. वीजपुरवठा सातत्याने खंडित होत असल्याने व्यापारी, दुकानदार व शेतकरी त्रस्त झाले आहेत. वीज कंपनीने याबाबत तातडीने उपायोजना करावी, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.
सुमारे साठ वर्षांपासून हिंगणगावला (ता . फलटण) लोणंद फिडरवरून वीजपुुरवठा केला जात आहे. गेल्या काही वर्षांत विद्युत खांब, विद्युत तारा जीर्ण झाल्यामुळे तुटण्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत. हिंगणगाव पटट्यात बागायती गावे असल्याने पन्नासच्या आसपास कृषी ट्रान्सफाॅर्मर आहेत. त्यावर शेकडो शेतकऱ्यांनी अनामत रक्कम भरुन कृषी पंपासाठी वीज जोडणी घेतली आहे. यावर्षी पाऊस व पाणीसाठा चांगला असल्याने बागायती क्षेत्रात वाढ झाली आहे. परंतु, वीजपुरवठा विस्कळीत होत असल्याने विहिरींना पाणी असूनही पिकांना देता येत नाही. वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
हिंगणगावची लोकसंख्या पाच हजाराहून अधिक आहे. गावात किराणा दुकान, पीठ गिरणी, दूध डेअरी, कृषी उद्योग, बॅंका, पतसंस्था, सोसायट्या आहेत. या सर्वांना वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने आर्थिक झळही सोसावी लागत आहे. वीज वितरणच्या अधिकाऱ्यांनी याबाबत तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.
(कोट)
उन्हाळा, पावसाळा असो की हिवाळा हिंगणगावची वीज कधी गायब होईल, हे सांगता येत नाही. वांरवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने आम्हाला अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. शिवाय आर्थिक नुकसानही होत आहे.
- संजय घोरपडे, व्यावसायिक, हिंगणगाव
फोटो : वीजपुरवठा (क्लिपआर्ट)