मयुरी विचारतेय ‘त्या’ दोघी कशा आहेत?
By admin | Published: January 3, 2016 10:26 PM2016-01-03T22:26:42+5:302016-01-04T00:48:02+5:30
रात्रभर आईकडे विचारपूस : मुलाणी भगिनींच्या मृत्यूची बातमी न सांगण्याचा डॉक्टरांचा सल्ला
दत्ता यादव -- सातारा : आपल्या घराशेजारील दोघी मैत्रिणी हे जग सोडून गेल्या आहेत, याची पुसटशीही कल्पना मयुरीला नाही. अपघातामुळे तिच्या अंगामध्ये कणकणी असतानाही तिने रात्रभर आईजवळ ‘त्या’ दोघींची चौकशी केली. ‘आई त्या दोघी कशा आहेत ग,’ अशी वारंवार ती विचारत होती. कंठ दाटून आलेल्या आईला ‘त्या दोघी चांगल्या आहेत,’ असं अखेर नाईजास्तव सांगावं लागलं.
मयुरी अन् तिच्या घराशेजारी राहणाऱ्या नजराना आणि मुस्कान जाईल तिकडे एकत्रच फिरायच्या. नोकरीही एकत्र ठिकाणीच करायची, असं मुस्कान आणि मयुरीनं ठरवलं होतं; पण नियतीला हे मान्य नसावं. मयुरीचं स्वप्न पूर्ण होण्यापूर्वीच मुलाणी भगिनींवर काळाने घाला घातला.
लिंबखिंडनजीक महामार्गावर नव्याने झालेल्या एका मॉलमध्ये शनिवारी मुलाखतीसाठी दुचाकीवरून ट्रीपलसीट जात असताना कारने त्यांना भीषण धडक दिली. यामध्ये नजराना (वय २२)आणि मुस्कान मुलाणी (२०, रा. जानाई-मळाई हौसिंग सोसायटी सातारा) या सख्ख्या बहिणींचा दुर्दैवी करूण अंत झाला. तर पाठीमागे बसलेल्या मयुरी गायकवाडचा दैव बलवत्तर म्हणून जीव वाचला. अपघात झाल्यानंतर नेमकं काय घडलं, हे मयुरीला समजलंच नाही. केवळ जोराचा आवाज कानावर आला आणि डोळ्यावर अंधाऱ्या आल्या. रुग्णालयात नेल्यानंतर काहीवेळांतच ती शुद्धीवर आली. डोक्याला, हाताला आणि पायाला गंभीर मार लागल्याने ती विव्हळत होती. तिची प्रकृती पाहण्यासाठी नातेवाइकांनी तिला गराडा घातला होता. अधूनमधून ती अश्रूला मोकळी वाट करून देत होती. रात्री दहानंतर तिने ‘मुस्कान आणि नजराना कशा आहेत,’ असा आईला प्रश्न केला. तिच्या आईनेही ह्दयावर दगड ठेवून आणि अश्रू लपवून ‘त्या’ बऱ्या आहेत. एवढंच उत्तर दिलं; परंतु जसजशी तिला मुस्कान आणि नजरानाची आठवण यायची, तशी ती पुन:पुन्हा आईला ‘त्या कुठे आहेत, कशा आहेत,’ असे विचारायची. रात्री बराचवेळ ती जागी होती. तिच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे.
नातेवाइकांची खबरदारी
‘सध्या मयुरी मानसिक धक्क्याखाली आहे. तिच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याशिवाय मैत्रिणींचा मृत्यू झाला आहे, हे तिला सांगू नका,’ असा सल्ला डॉक्टरांनी नातेवाइकांना दिला आहे. त्यामुळे तिला पाहण्यासाठी येणाऱ्यांपैकी चुकून कोणी मुलाणी भगिनींविषयी बोलू नये, यासाठी मयुरीचे नातेवाईक प्रचंड खबरदारी घेत आहेत.