अडीच वर्षात कऱ्हाडचा काय विकास झाला?
By admin | Published: January 29, 2017 10:42 PM2017-01-29T22:42:45+5:302017-01-29T22:42:45+5:30
रावसाहेब दानवे : कार्वेतील भाजपच्या सभेत पृथ्वीराज चव्हाणांवर टीका; पक्षावर आरोप करण्याचा अधिकार नाही
कऱ्हाड : कऱ्हाड दक्षिणेत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी निवडून आल्यापासून काय विकास केला? या भागातील जनतेचे अनेक प्रश्न आजही सुटलेले नाहीत. ज्या लोकांनी निवडून दिले त्यांना भेटण्यासाठीही साधा यांच्याकडे वेळ नाही. सत्ता असूनही या भागाचा विकास करता आला नाही. राज्यात आघाडी सरकारमध्ये असताना त्यांनी सत्तर हजार कोटींचा घोटाळा केला. त्यामुळे त्यांना जनतेने नाकारले,’ असे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केले.
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाची कार्वे, ता. कऱ्हाड येथे रविवारी दुपारी प्रचार प्रारंभ सभा पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महसूल व सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांतदादा पाटील, भाजपच्या उपाध्यक्षा नीता केळकर, कृष्णा सहकारी कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले, भाजपचे प्रदेश चिटणीस डॉ. अतुल भोसले, भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष संग्राम माळी, स्वप्नील भिंगारदेवे, जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, उपाध्यक्ष रामकृष्ण वेताळ, प्रांतिक सदस्य अॅड. भरत पाटील, राजाभाऊ देशपांडे, पै. आनंदराव मोहिते, जगदीश जगताप, नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, बाजार समिती माजी सभापती पै. शिवाजीराव जाधव, कृष्णा कारखान्याचे माजी संचालक बाळासाहेब पाटील आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रदेशाध्यक्ष दानवे म्हणाले, ‘राज्यात नगरपालिका निवडणुकातील यशानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत भाजपचा उमेदवार निवडणूक आणण्यासाठी पक्षाकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. कऱ्हाडसारख्या राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या तालुक्यात आजवर काँग्रेस व राष्ट्रवादीचे वर्चस्व होते. त्याकाळी पृथ्वीराज चव्हाण यांनी या भागाचा काय विकास केला, हे दाखवून द्यावे. मुख्यमंत्री पदावर असताना त्यांना सत्तर हजार कोटी रुपये खर्च करूनही राज्यातील शेती भिजविता आली नाही.
चोवीस टीएमसी पाणी अडविण्यासाठी काँगे्रस-राष्ट्रवादीला आठ वर्षे लागली. ते पाणी भाजपने एका वर्षात अडवून दाखवले. भाजपला शेतीतले कळत नाही. हा जातीयवादी पक्ष आहे, असा राष्ट्रवादी व काँग्रेसच्या वतीने सगळीकडे अपप्रचार पसरविला जातोय. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘सबका साथ सबका विकास’च्या माध्यमातून सर्व धर्मातील लोकांचा विकास केला आहे. सर्वच क्षेत्रात विकासाच्या कामांना सुरुवात केली आहे. उलट ६८ वर्षांत जे काँगे्रस राष्ट्रवादीला जमले नाही ते दोन वर्षांत भाजपाने करून दाखवले. त्यामुळे भाजपावर जातीयवादी पक्ष असल्याचा आरोप करण्याचा त्यांना नैतिक अधिकार नाही.’ असेही यावेळी रावसाहेब दानवे म्हणाले.
डॉ. सुरेश भोसले म्हणाले, ‘साडेतीन वर्षे येथील लोक अन्याय सहन करत आले आहेत. मात्र, आता हे सहन केले जाणार नाही. काँग्रेस व राष्ट्रवादी आमच्याकडे पुन्हा बघणार नाहीत, असे मतदान करा. पूर्वीच्या राजकारणाला आता लोक कंटाळले आहेत.’
यावेळी डॉ. अतुल भोसले, पै. शिवाजीराव जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. निवासराव थोरात यांनी प्रास्ताविक केले. जगदीश जगताप यांनी आभार मानले. सभेस कार्वे जिल्हा परिषद गटातील कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सुनील जाधव यांनी रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. (प्रतिनिधी)