‘बाबां’च्या मनात काय?

By admin | Published: July 7, 2014 11:04 PM2014-07-07T23:04:43+5:302014-07-07T23:06:17+5:30

होणार का स्वारी ‘दक्षिणे’वरी ! : होमपिचवर सुरू राजकीय खलबते

What do you think of Baba? | ‘बाबां’च्या मनात काय?

‘बाबां’च्या मनात काय?

Next

कऱ्हाड : राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झालीय. या आखाड्यात उतरण्याची अनेकांनी तयारी चालविलीय. कऱ्हाड दक्षिणेवर तर अनेकांच्या जोर बैठका सुरू आहेत; पण यंदा दक्षिणेत ‘पृथ्वीराज’ अवतरणार का? याबाबत सर्वांना उत्सुकता आहे. मुख्यमंत्र्यांनी मात्र याबाबत कोणतेच भाष्य न केल्याने या बाबांच्या मनात नक्की काय चाललंय काय? असाच प्रश्न त्यांच्या समर्थकांना पडलाय !
दिल्लीत रमलेल्या पृथ्वीराज चव्हाणांवर तीन वर्षांपर्वी अनपेक्षितपणे राज्याची जबाबदारी पडली. महाराष्ट्रात सहा महिनेही ते टिकणार नाहीत, अशा वल्गना सुरुवातीला होत होत्या; पण त्यांनी त्या खोट्या ठरविल्या.
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर चव्हाणांची खुर्ची अस्थिर झाली खरी; पण दिल्लीश्वरांच्या आशीर्वादाने त्याला पुन्हा बळकटी आली. त्यांच्याविरोधात बंड करणारेही आज थंडोबा झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुका पृथ्वीराज चव्हाणांच्या नेतृत्वाखाली लढल्या जाणार, असे मानले जाते.
विधानसभा निवडणुकीचा आजवरचा इतिहास पाहता ज्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढल्या आहेत, त्यांनी स्वत: विधानसभेची निवडणूक लढविली आहे. तसा तो अलिखित नियमच मानला जातो. हाच नियम पृथ्वीराज चव्हाणांना लागू धरला तर त्यांनी कुठल्यातरी मतदार संघातून लढणे अपेक्षित आहे. मग ते आपल्या ‘होमपिच’ला प्राधान्य देणार का? हा चर्चेचाच विषय बनलाय.
कऱ्हाड दक्षिण विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला! पण मुख्यमंत्र्यांचे पक्षाअंतर्गत विरोधक असणाऱ्या उंडाळकरांकडे या गडाच्या चाव्या आहेत. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री झाल्यावर मात्र त्यांनी मतदारसंघाची विकासकामांच्या माध्यमातून चांगलीच राजकीय ‘डागडुजी’ केली आहे. त्यांची ही डागडुजी पाहता ते दक्षिणेतून लढतील, अशी अटकळ बांधली जात आहे.
मध्यंतरी मुंबईत पत्रकारांनी चव्हाणांना याबाबत छेडले होते. ‘तुम्ही विधानसभा लढणार का?’ असा सवाल पत्रकारांनी केला होता. त्यावर केवळ ‘बघू’ असे संदिग्ध उत्तर त्यांनी दिले होते. तर साताऱ्यात पत्रकारांशी बोलताना ‘मी दक्षिणेतून लढणार असल्याचे म्हटले नाही,’ असही त्यांनी स्पष्ट केले होते; पण ‘मी दक्षिणेतून लढणारच किंवा लढणारच नाही,’ असे कुठलेही अधिकृत भाष्य त्यांनी आजअखेर केलेले नसल्याने ‘बाबांच्या मनात काय चाललंय काय?’ असा संभ्रम कार्यकर्त्यांच्या मनात निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण तो संभ्रम लवकरच दूर करतील, अशी साऱ्यांची अपेक्षा आहे. (प्रतिनिधी)

Web Title: What do you think of Baba?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.