गुणवत्ता असेल तर सिद्ध करायची भीती कसली?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:45 AM2021-09-15T04:45:30+5:302021-09-15T04:45:30+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : कोरोना काळात विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाचे किती आकलन झाले याची माहिती न घेताच गुणदान करण्यात आले ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : कोरोना काळात विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाचे किती आकलन झाले याची माहिती न घेताच गुणदान करण्यात आले आहे. नीट परीक्षेच्या माध्यमातून गुणवत्तेची चाळण लागणं आवश्यक आहे. ज्यांची आर्थिक क्षमता नाही, त्या विद्यार्थ्यांना केवळ नीटमुळेच गुणांच्या आधारावर शासकीय महाविद्यालयांत प्रवेश मिळतो. गुणवत्ता असेल तर ती सिद्ध करायची भीती कसली? असा सवाल उपस्थित होत आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण करून बाहेर पडणारे विद्यार्थ्यांनी कोणाच्या जिवाशी खेळू नये यासाठी नीटची परिक्षा देणं आवश्यक असल्याचे मत सातारकरांनी व्यक्त केले.
उच्चस्तरीय समितीच्या शिफारशी, सामाजिक न्याय, समानतेचे तसेच प्रभावित मूल्यांचे रक्षण करण्यासाठी मेडिकल प्रवेशासाठी नीटची परीक्षा रद्द करण्याचे विधेयक तामिळनाडूत मांडण्यात आले. मात्र, या निर्णयाने वैद्यकीय क्षेत्राला मोठा धक्का बसणार आहे. नीट परीक्षेतून होणारे गुणवत्तेचे परीक्षण न झाल्याने कमी पात्रता असलेल्यांनाही वैद्यकीय प्रवेश घेता येईल. मात्र पुढे शैक्षणिक वाटचाल करताना, अभ्यास करताना त्यांना त्याचे किती आकलन होईल याबाबत शंका आहे. याबरोबरच अभ्यासक्रम झेपत नाही, म्हणून स्वत:चे आयुष्य संपविण्याची मानसिकताही वाढीला लागू शकते, असे शैक्षणिक तज्ज्ञ सांगतात.
चौकट :
काय आहे तामिळनाडूचा धक्कादायक निर्णय
तामिळनाडूत सेलम जिल्ह्यातील धनुष नावाचा विद्यार्थी परीक्षेला सामोरे जाण्यापूर्वीच तणावाखाली आला आणि त्याने आत्महत्या केली. तो तिसऱ्यांदा या परीक्षेसाठी बसत होता. धनुषच्या आत्महत्येचे पडसाद तामिळनाडूच्या विधानसभेच्या चालू असलेल्या अधिवेशनात उमटले. विरोधी पक्ष आण्णा द्रमुकने हा विषय लावून धरला. त्याचाच परिणाम म्हणून नीट परीक्षेतून राज्यातील विद्यार्थ्यांना सूट देणारे विधेयक तामिळनाडू विधानसभेत मांडले गेले आणि संमतही झाले. त्या राज्यातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय प्रवेशासाठी केंद्रीय नीटची गरज नाही, असाच या कायद्याचा अर्थ आहे.
मेडिकल प्रवेश कसे ?
बारावीच्या गुणांनाच उच्च शिक्षणाचा आधार बनवायला हवे. आम्ही देखील राज्यातील कोरोना परिस्थिती पाहून बारावीची परीक्षा रद्द केली. आमच्या राज्यातील सर्व प्रोफेशनल आणि इतर महाविद्यालय प्रवेश बारावीच्या आधारावर घेतले जाणार आहेत. विद्यार्थी, शिक्षक, पालक, मेडिकल प्रोफेशनल्सची मोठी संख्या पाहता हा निर्णय घेतल्याचे तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांचे म्हणणे आहे. पण हा निर्णय आर्थिक मागास घटकांना वैद्यकीय क्षेत्रापासून दूर ठेवणारा असाच आहे.
धक्कादायक निर्णय
कोट :
१. वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी आवश्यक असणारी नीट परीक्षा महत्त्वपूर्ण आहे. विषयाचे ज्ञान किती आहे, हे पाहण्यासाठी ही परीक्षा महत्त्वपूर्ण आहे. तडकाफडकी परीक्षा न घेण्याचा निर्णय भविष्यात अनेक अडचणींना निमंत्रण देणारा ठरणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रात तरी या परीक्षा व्हाव्यात.
-विद्यार्थी
२. पदवीपूर्व वैद्यकीय, दंतवैद्यकीय, आदी अभ्यासक्रमांसाठी नीट अर्थात नॅशनल एन्ट्रन्स कम एलीजिबिलिटी टेस्ट दिल्याने आर्थिक असक्षम गटातील मुलांना निव्वळ गुणवत्तेच्या आधारे शासकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवणे आणि शिक्षण घेऊन स्वप्नपूर्ण करणे शक्य होते. ही परीक्षा रद्द झाली तर वैद्यकीय क्षेत्र केवळ धनदांडग्यांसाठीच आरक्षित होण्याची भीती आहे.
- विशाल ढाणे, शिक्षणतज्ज्ञ, सातारा