उरमोडीचं खळाळलं जिहे-कटापूरचं काय?
By admin | Published: September 9, 2016 11:29 PM2016-09-09T23:29:24+5:302016-09-10T00:39:14+5:30
पाणीप्रश्नावर निवडणुका लढणारे नेतेही चिडीचूप : सांगा योजना कधी लागणार मार्गी? माण-खटाव वासीयांचा सवाल
दहिवडी : माण तालुक्यामध्ये उरमोडी योजनेचे पाणी आले असून, श्रेयवादावरून राजकारण चांगलेच रंगू लागले आहे, असे असताना दुसरीकडे मात्र तालुक्यासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या जिहे-कटापूर योजनेबद्दल मात्र कोणीही बोलायला तयार नाही. या योजनेमुळे माण-खटावमधील ७० टक्के भाग सिंचनाखाली येणार आहे. असे असताना केवळ श्रेयवादाच्या राजकारणात या योजनेकडे लक्ष द्यायला कोणालाही वेळ नाही.
राज्यातील दुष्काळी तालुक्याचा पाणी प्रश्न निकाली काढावा यासाठी सर्व प्रथम १९९५ मध्ये माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी ठोस धोरण आखले. त्यातून पश्चिम महाराष्ट्रासाठी कृष्णा खोरे महामंडळाची स्थापना झाली. त्यामध्ये वसना, वांगना, जाणाई, शिरसाई, टेंभू योजनेसह माण-खटावला वरदान ठरणाऱ्या जिहे-कटापूर व उरमोडी योजनेचा समावेश केला गेला. दिवंगत अभयसिंहराजे भोसले, उदयनराजे भोसले, हिंदुराव नाईक-निंबाळकर, रामराजे नाईक-निंबाळकर, भाऊसाहेब गुदगे, सदाशिवराव पोळ यांनी पहिल्या टप्प्यात या योजना गतिमान केल्या. यासाठी प्रसंगी कर्जरोखे काढले गेले. त्यामुळे या योजनेला गती आली. त्यानंतर युतीचे शासन गेले, आघाडीचे आले. अनेक निवडणुका या पाण्यावर होऊ लागल्या. खटावमध्ये डॉ. दिलीपराव येळगावकर, आमदार जयकुमार गोरे हे या आंदोलनात यशस्वी झाले. त्यांनी पाणी हाच माण-खटावचा श्वास असल्याने यावर लक्ष केंद्रित केले व निवडणुकाही जिंकल्या. आज उरमोडीचे श्रेय घेण्यासाठी अनेकजण धावतात; पण ‘ज्याच्या हातात ससा तो पारधी’ या म्हणीप्रमाणे सत्ताधारी जरी या योजनेचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करीत असले तरी सर्वांचेच श्रेय या योजनेसाठी आहे हे नाकारून चालणार नाही. मग हिंदुराव नाईक-निंबाळकर, डॉ. दिलीप येळगावकर, रणजितसिंह देशमुख, सुरेंद्र गुदगे यांची आंदोलने असोत किंवा आमदार गोरे, रामराजे नाईक-निंबाळकर, शशिकांत शिंदे यांचे शासकीय पातळीवर केलेले योगदान असो किंवा वाघोजीराव पोळ, विश्वंबर बाबर, अजितराव राजेमाने, अॅड. भास्करराव गुंडगे, डॉ. महादेव कापसे यांच्या पाणी परीक्षा असो प्रत्येकाने या पाण्यासाठी संघर्ष केला आहे. त्यामुळे हे श्रेय सर्वांचेच आहे. हेही नाकारून चालणार नाही. आज उरमोडीचे पाणी माण-खटावला पोहोचले आहे. यावर अनेकजण आता श्रेयवादावरून राजकारण करू लागले आहेत. मात्र, कसे का असेना माणला पाणी आले.
उरमोडीचे पाणी आले परंतु जिहे-कटापूरवर एक ही शब्द निघत नाही. अधूनमधून सहा महिन्यांत पाणी येणार? तीन महिन्यांत पाणी येणार हे निवडणुकीपुरते दिलेले आश्वासन गेली १० वर्षे जनता ऐकत आहे. उरमोडी योजना झाली. चांगली गोष्ट आहे; पण माण-खटावला ज्या योजनेसाठी खरी गरज आहे ती जिहे-कटापूरच योजना आहे. आज ही योजना पूर्ण होणे गरजेचे आहे. त्यावर कोणत्याच नेत्यांनी म्हणावे तितके प्रयत्न केले नाहीत. ही वस्तुस्थिती आहे. केंद्र शासनाने महाराष्ट्रातील अनेक सिंचन प्रकल्पासाठी निधी दिला. त्यावेळी श्रेयवाद घेणाऱ्या मंडळींनी या योजनेत जिहे-कटापूरचा समावेश व्हावा यासाठी किती प्रयत्न केले हे ही जनतेसमोर आले पाहिजे. असे उरमोडीचे श्रेय घेण्यासाठी चढाओढ झाली तशी जिहे-कटापूरसाठी झाली तरी चालेल; पण ही योजना पहिली पूर्ण करा, अशी जनतेची अपेक्षा आहे. (प्रतिनिधी)
...तर हजारो हेक्टर क्षेत्र ओलिताखाली
जाणाई-शिरसाई, जिहे-कटापूर या योजनेचे एकाच दिवशी नारळ फुटले असताना जिहे-कटापूर योजना अपुरीच कशी? उरमोडीमुळे तालुक्याचे २० टक्के क्षेत्र सिंचनाखाली येते. परंतु जिहे-कटापूर योजना झाल्यास माण-खटावमधील ७० टक्के भाग सिंचनाखाली येणार आहे. खटावमध्ये नेर तलावात माणमध्ये आंधळी तलावात पाणी सुटणार आहे. आंधळीची पातळी ०.२६२ अब्ज घनफूट आहे. या एकट्या तालुक्यामुळे ४९८ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. या दोन्ही तलाव्यात पाणी आल्यास कोणत्याही गावाला पाणी देणे शक्य होणार आहे, असे असताना जिहे-कटापूर योजनेवर भर देणे गरजेचे आहे.
जिहे-कटापूर व उरमोडी योजना ही युती शासनाची कल्पना असून, कोणी काहीही म्हणजे युती शासनाने सुरू केलेली योजना युती शासनाच्या काळातच पूर्ण होईल. त्यासाठी पालकमंत्रीही आग्रही असून, जिहे-कटापूरचे पाणी लवकरच माणमध्ये येईल.
- अनिल सुभेदार,
जिल्हा शिवसेना उपप्रमुख