तरूण मतदारांना खूश करण्यासाठी काय पण..!
By admin | Published: September 1, 2014 10:38 PM2014-09-01T22:38:22+5:302014-09-01T23:07:20+5:30
माण-खटाव-कोरेगाव : मंडळांना वर्गणी भरभरून; पण लपून छपून
सातारा : गणेशोत्सवाने यंदाच्या वर्षी नेत्यांना सुखावले आहे. आचारसंहिता लागल्याची शक्यता असल्यामुळे इच्छुक उमेदवारांनी हात आखडता घेत बाप्पांच्या वर्गणी आणि देणगीला चाप लावला आहे. या उलट परिस्थिती माण, खटाव आणि कोरेगावमध्ये पहायला मिळते. तेथे लपून छपून मोठ्या प्रमाणात दमदार आकड्याची वर्गणी मंडळाकडे पोहोच केली जात आहे.
ऐन निवडणुकीच्या तोंडावर प्रतिष्ठापनेपूर्वी आचारसंहिता लागली असती तर त्याचा निश्चित आर्थिक फायदा मंडळांना झाला असता. इच्छुक उमेदवारांच्यात बाप्पांची भक्ती उफाळून आल्याने मंडळांचा खर्च भागला असता, अशी हवा होती. मात्र आचारसंहिता लांबणीवर पडल्यामुळे ही हवा पुरती निघाली आहे.
गणेशोत्सवाचा फायदा झाला आहे तो माण खटाव आणि कोरेगाव परिसरातील मंडळांना. मंडळांच्या तोंडाला येईल ती वस्तू देण्याची चढाओढ जणू येथील उमेदवारांच्यात लागली आहे. कोणी डॉल्बी तर कोणी झांज पथकाचा खर्च, कोणी प्रासादिक पुजेचा खर्च उचलतोय तर कोणाला नाव न सांगता केवळ पैसे देण्यात अधिक रस आहे.
बाप्पांच्या भक्तीत सर्वचजण मग्न आहेत. येऊ घातलेल्या निवडणुकीमुळे भक्तिमय वातावरणही चांगलेच तापले आहे. कोण मोठा भक्त याची चढाओढ लागल्यामुळे याचा थेट लाभ गणेशोत्सव मंडळांना होत असल्याचे चित्र दिसत आहे. कारण काहीही असो नेत्यांच्या खिशातून कधी नव्हे इतकी वर्गणी येत असल्याचे पाहून सर्वचजण सुखावले आहेत. (प्रतिनिधी)
कोणाला मिळतेय भरघोस वर्गणी?
ज्या मंडळांमध्ये मोठया प्रमाणावर भक्तांची गर्दी असते शक्यतो अशाच मंडळांना मोठ्या रकमेची वर्गणी दिली जाते. त्या त्या परिसरातील खूप वर्षांची परंपरा असणाऱ्या मंडळांचाही यात समावेश आहे. युवांची ऊर्जा निवडणुकीत खूप उपयोगाला येते. हे लक्षात ठेवून काहीदा युवकांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या मंडळालाही भरघोस मदत केली जात असल्याचे चित्र दिसते. या युवकांचा पुढे निवडणुकीत योग्य उपयोग करून घेण्यासाठी ही मदत केली जाते. त्याबरोबरच व्यापारी एकत्र येतील अशा मंडळांनाही भरीव मदत केली जाते. यामुळे एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर व्यापारी वर्ग मिळतो.
पाच हजार ते पन्नास हजार....!
निवडणुकीच्या तोंडावर कोणालाही नाराज करायचे नाही, हे तत्व उराशी बाळगून नेते मंडळींनी आपली वाटचाल सुरू ठेवली आहे. त्यामुळे इच्छुकांसह मातब्बर उमेदवारांनीही येईल त्याला वर्गणी दिली गेल्याची जोरदार चर्चा आहे. नवख्या आणि अपरिचित अशा गणेशोत्सव मंडळांना कमीत कमी पाच हजार रूपयांची वर्गणी दिली जात आहे. आपल्या परिचयाचे, आपल्या कार्यकर्त्यांची मंडळे असतील तर पाच आकडी वर्गणी निश्चितच असते. माण, खटाव आणि कोरेगाव या भागातील काही मंडळांनी तर या नेत्यांकडे चक्क मोठ मोठ्या जबाबदाऱ्या दिल्या आहेत. या जबाबदाऱ्या पूर्ण करता करता नेत्यांची त्रेधा उडत आहे. पण मतदारांना खूष करण्यासाठी काय पण हे तत्व सर्वत्र दिसत आहे.
नेत्यांसाठी जबाबदारी
बहुतांश मंडळे रोख रक्कम घेण्यापेक्षा नेत्यांना उत्सव काळात विशिष्ट जबाबदारी देत असल्याचे चित्र दिसते.
१. विसर्जन मिरवणुकीची सुपारी
२. बेंजो पार्टीचे पैसे
३. ढोल-लेझीम यांची सुपारी
४. पत्र्याची पेटी
५. प्रासादिक पूजेचा खर्च
६. डॉल्बीचा खर्च
७. मूर्तीचा खर्च
८. मंडळाच्या नावाचे टी-शर्ट बनियन तयार करून घेणे
९. देखाव्यासाठी लागणारा खर्च करणे
१०. अन्य खर्चासाठी लागणारा निधी उपलब्ध करून देणे