खिंडार पाडण्याची भाषा वापरणाऱ्या चंद्रकांत पाटलांचं कर्तुत्व काय? : शरद पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 03:32 PM2018-09-22T15:32:38+5:302018-09-22T15:42:35+5:30
राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडण्याची भाषा वापरणाऱ्या चंद्रकांत पाटील यांचं व त्यांच्या पक्षाचं कर्तुत्व काय?, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी शनिवारी मंत्री पाटील यांच्या वक्तव्यांचा चांगलाच समाचार घेतला. सातारा येथील शासकीय विश्रामगृहावर शनिवारी त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.
सातारा : राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडण्याची भाषा वापरणाऱ्या चंद्रकांत पाटील यांचं व त्यांच्या पक्षाचं कर्तुत्व काय?, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी शनिवारी मंत्री पाटील यांच्या वक्तव्यांचा चांगलाच समाचार घेतला. सातारा येथील शासकीय विश्रामगृहावर शनिवारी त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.
राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना हिंमत असेल तर दोन्ही काँगे्रसने स्वतंत्रपणे निवडणूक लढवून दाखवावे, राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडणार, असे आव्हान दिले होते.
याबाबत छेडले असता, खा. पवार म्हणाले, चंद्रकांत पाटील ज्या राजकीय पक्षात आहेत, त्या पक्षाने देशपातळीपासून राज्यामध्ये स्वतंत्रपणे निवडणूक लढवली का कधी? त्यांचे संपूर्ण नियोजन कधी शिवसेना कधी रिपब्लिकन
पक्षाचे रामदास ठाकरे, यांच्या मदतीने होते.
स्वत:चं झाकून ठेवायचे आणि दुसऱ्यांचं दाखवा म्हणून सांगायचं हे शहाणपणाचे लक्षण नाही. त्यांना बोलायचा फारसा अधिकारच नाही. त्यांनी काही स्वतंत्र कर्तुत्व दाखवलं का? चार वर्षांत राज्याच्या हिताचं काय काम करावं, ते सांगावं. देशात व राज्यात अनेक प्रश्न आहेत, त्यांच्या नेत्यांनी घेतलेल्या निर्णयांवर त्यांनी बोलावं.
राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडणार, असे मंत्री पाटील म्हणाले होते, याबाबत खा. पवार म्हणाले, त्यांनी खिंडार पाडण्याचा उद्योग कधी सुरु केला हे मला माहित नाही. लोकसभेच्या निवडणुकीबाबत फसवाफसवी होऊ नये, अशी मागणी केल्याची माहिती खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकारांशी बोलताना दिली होती, याबाबत
विचारले असता खा. पवार म्हणाले, ते तुमच्याशी बोलले, माझ्याशी असं काही बोलले नाही. ते पक्षाचे खासदार आहेत. त्यांनी मला वेळ मागितली होती. त्यानुसार ते भेटायला आले होते. माझ्यापर्यंत तो प्रश्न नाही.
लोकसभेसाठी माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांचे नाव पुढे येत आहे, याबाबत विचारले असता. खा. पवार म्हणाले, मी तर कुणाशी चर्चा केलेली नाही. पक्षाची बैठकही घेतलेली नाही. पक्षाच्या आमदारांनी कुणाचं नाव सुचविलं आहे का? या प्रश्नावर खा. पवार म्हणाले, पक्षामध्ये काही समज-गैरसमज असतात. ते आजच नाही तर दहा
वर्षांपासून त्याचा मी अनुभव घेत आहे. पण आमचं काम स्मूथली यशस्वीरित्या होत नाही.
अजून आम्ही तव्यापर्यंत गेलोच नाही
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाकरी करपलीय का? या प्रश्नावर बोलताना खा. पवार म्हणाले, आम्ही अजून तव्यापर्यंत गेलेलोच नाही. पक्षाची बैठक झाल्यानंतर याबाबत जो काय व्हायचा तो निर्णय होईल.