CoronaVirus Lockdown : पोटासाठी काय पण: खाण्यासाठी पशुपक्षी थेट गावात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2020 12:08 PM2020-06-11T12:08:51+5:302020-06-11T12:11:53+5:30
शक्यतो कधीही न माणसाळणारे पशुपक्षी सध्या खाण्या-पाण्याच्या शोधार्थ नागरीवस्तीत येऊन आपली तहान, भूख भागविण्यासाठी गावागावात येत असल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे. उन्हाचा तडाखा संपला असला तरी ग्रामीण भागातील रानोमाळ भटकणारे पशुपक्षी आपल्या अन्नपाण्यासाठी थेट गावात येऊ लागले आहेत. यंदाचा उन्हाळा व लॉकडाऊन सर्वांनाच खूप त्रासाचा ठरला आहे, असे वाटू लागले आहे.
रशिद शेख
औध: शक्यतो कधीही न माणसाळणारे पशुपक्षी सध्या खाण्या-पाण्याच्या शोधार्थ नागरीवस्तीत येऊन आपली तहान, भूख भागविण्यासाठी गावागावात येत असल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे. उन्हाचा तडाखा संपला असला तरी ग्रामीण भागातील रानोमाळ भटकणारे पशुपक्षी आपल्या अन्नपाण्यासाठी थेट गावात येऊ लागले आहेत. यंदाचा उन्हाळा व लॉकडाऊन सर्वांनाच खूप त्रासाचा ठरला आहे, असे वाटू लागले आहे.
यंदा कोरोनामुळे पशुपक्ष्यांना नागरिकांचे दर्शन दुर्मीळ झाले होते. बाजार, मंडई भरत नसल्याने पक्षी तसेच वानरसेना आता घरोघरी पोहोचू लागले आहेत. औंध परिसरातील अनेक गावांमधील नागरिक पशुपक्ष्यांच्या खाण्याची व्यवस्था करू लागले आहेत. अनेक गावांमध्ये तरकारी उत्पन्न घेणारे शेतकरी यंदा निवांतच असल्याने उन्हाळ्यात पक्ष्यांचे व विशेषत: वानरसेनेचे पोटाचे हाल होत आहेत.
अनेक ठिकाणचे पाणवठे, जलसाठे मोठ्या प्रमाणात कोरडे पडले आहेत. अजूनपर्यंत शेतांमधील सुगीला सुरुवात नाही. सर्वत्र रुक्ष वातावरण निर्माण झाले आहे. त्याची झळ अनेक पशु-पक्ष्यांना बसू लागली आहे. शेते मोकळी झाल्याने या प्राण्यांना त्याठिकाणी खायला काहीच उपलब्ध नाही.
पाणीसाठे मोकळे झाल्याने अन्नपाण्याच्या शोधासाठी वानरे, पक्षी व अन्य प्राणी गावांमध्ये येऊ लागले आहेत. मागील काही दिवसांमध्ये औंध, कुरोली, जायगाव, खरशिंगे, गोपूज व अन्य गावे वाड्या-वस्त्यांवरील वस्त्यांमध्ये त्यांनी ठाण मांडल्याने हे प्राणी माणसाळले आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी त्यांना अन्नपाणी दिले जात आहे. पण काही ठिकाणी त्यांची भटकंती सुरू आहे. पुढील दोन महिने या मुक्या जीवांचे कसे जाणार? याचीच धास्ती निर्माण झाली आहे.
मुक्या प्राण्यांसाठी संघटनांनी पुढाकार घ्यावा..
औंध येथील शिवसंकल्प प्रतिष्ठानच्या सभासदांनी औंध येथील डोंगर परिसरात पक्ष्याचा वावर असलेल्या जवळपास वीस ठिकाणी दीड लिटर पाणी बसेल एवढे कॅन झाडांना अडकवून त्यांची व्यवस्था केली आहर. एक दिवसाआड त्यामध्ये पाणी भरावे लागत आहे. त्यामुळे बऱ्यापैकी पक्षी तेथे आपली तहान भागवतात. अशा अनेक सामाजिक संघटनांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे.
आमच्या घराच्या गच्चीवर दररोज सकाळी किंवा संध्याकाळी माकडे येत असतात. आम्ही त्यांना भाकरी, चपाती तसेच अन्य खाद्यपदार्थ खाण्यासाठी देतो. अगदी माणसाळलेले आहेत. मुलेही जवळ जाऊन त्यांना खाऊ घालतात.
-दीपक नलवडे,
उपसरपंच, औंध