बिचाऱ्या व्यापाºयांचा काय दोष होता? दगडफेकीत लाखो रुपयांचे नुकसान : व्यावसायिक आता विमा कंपन्यांच्या दारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 11:27 PM2018-07-26T23:27:50+5:302018-07-26T23:28:10+5:30
सातारा शहरात बुधवारी झालेल्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनामध्ये दुकानांचे नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले. चारचाकी वाहनांचीही तोडफोड करण्यात आली. सातारा-कोरेगाव रस्त्यावरील राजपुरोहित स्वीट्स व महामार्गालगतचे कणसे होंडा या शोरूमच्या
सागर गुजर।
सातारा : सातारा शहरात बुधवारी झालेल्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनामध्ये दुकानांचे नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले. चारचाकी वाहनांचीही तोडफोड करण्यात आली. सातारा-कोरेगाव रस्त्यावरील राजपुरोहित स्वीट्स व महामार्गालगतचे कणसे होंडा या शोरूमच्या काचा आंदोलकांनी फोडल्याने या काचांचा चुराडा पाहायला मिळत होता.
या दगडफेकीत लाखो रुपयांचे नुकसान झाले. पोलिसांनी याबाबत पंचनामा करून तोडफोड करणाºयांवर गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू केले आहे. येथील राजपुरोहित स्वीट्सचे कन्हैय्यालाल राजपुरोहित सांगत होते. मोर्चामुळे दुकान बंदच ठेवण्यात आले होते. परंतु या दुकानाच्या वरच्या बाजूला आकर्षक काचा आहेत, त्यावरच दगडफेक झाली. त्यातून काचा फुटून मोठे नुकसान झाले. पोलिसांनी गुन्हे दाखल करून घेतले आहेत. आमच्या दुकानाचा विमा असल्याने नुकसानीची फार झळ बसणार नाही.
बॉम्बे रेस्टॉरंटपासून जवळच असणारे कणसे होंडा हे शोरूमही आंदोलकांनी लक्ष्य केले. हे शोरूम बंद होते. दुकानाचे दार काचेचे आहे. वरच्या बाजूला लोखंडी शटरही नाही. काही आंदोलकांनी या शोरूमच्या बाहेरून या काचेवर दगड फेकले. यात दुकानाची काच पूर्णत: फुटली. गुरुवारी शोरूम उघडण्यात आले. व्यवहार पूर्ववत सुरू झाले; पण दुकानाबाहेर काचांचा खच मोठ्या प्रमाणावर पडला होता.
दरम्यान, आंदोलन सुरू असताना या शोरूमच्या पुढे पोलीस येऊन थांबली होते. या व्हॅनमधील काही महिला पोलीस शोरूमसमोर थांबल्या असताना आंदोलकांनी त्यांच्या दिशेने दगडफेक केली. हे दगड थेट काचेच्या दारावर जाऊन आदळले.
आंदोलनामुळे शोरूम बंद ठेवण्यात आले होते. मी स्वत: मराठा मोर्चाचा समन्वयक असल्याने मी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उभा होतो. त्याचवेळी शोरूमच्या काचा फुटल्याची माहिती मिळाली. लाखभर रुपयांचे नुकसान झाले; पण याचा विमा असल्याने आर्थिक झळ बसणार नाही.
- आनंदराव कणसे, होंडा शोरूम
आमच्या स्वीट मार्टच्या काचा फुटल्या आहेत. गेटलाईटसही फुटल्या. जवळपास अडीच लाखांचे नुकसान झाले आहे. विमा असल्याने हे नुकसान भरून निघेल.
- कन्हैय्यालाल राजपुरोहित