पाच ठिकाणच्या दगाबाजीचे राष्ट्रवादी नेते काय करणार ?

By admin | Published: April 1, 2015 11:09 PM2015-04-01T23:09:39+5:302015-04-02T00:41:39+5:30

‘प्रदेश’चा कानाडोळा : सर्वात लाजिरवाणे पराभव सांगलीत

What will the five-nation nationalist leaders of the riot? | पाच ठिकाणच्या दगाबाजीचे राष्ट्रवादी नेते काय करणार ?

पाच ठिकाणच्या दगाबाजीचे राष्ट्रवादी नेते काय करणार ?

Next

अविनाश कोळी - सांगली विधानसभेच्या निवडणुकीत अधिकृत उमेदवाराविरोधात काम करणाऱ्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना संघटनेतून बाहेर काढण्याचा निर्धार राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत मंगळवारी घेण्यात आला. मात्र पश्चिम महाराष्ट्रात सर्वात लाजिरवाणे पराभव झालेल्या सांगली जिल्ह्यातील कुरघोड्यांबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. या बैठकीत केवळ शिरोळ, हातकणंगले, इचलकरंजी याठिकाणच्या पराभवाची जबाबदारी निश्चित करण्याचे ठरले. सांगली जिल्ह्यातील तब्बल पाच मतदारसंघात पक्षातील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केलेल्या दगाबाजीचे काय होणार?, याचे उत्तर फटका बसलेल्या उमेदवारांना अजूनही मिळालेले नाही.
केवळ शिरोळ, हातकणंगले आणि इचलकरंजी येथील पक्षविरोधी कामाचा गाजावाजा करताना सांगली जिल्ह्यातील पाच मतदारसंघातील पराभवाकडे प्रदेश कार्यकारिणीने दुर्लक्ष कसे केले?, असा सवाल आज सांगली जिल्ह्यातील राजकीय गोटात चर्चेत होता. सांगली, मिरज, खानापूर-आटपाडी, पलूस-कडेगाव आणि शिराळा या पाच मतदारसंघात पक्षाची ताकद असूनही, त्याप्रमाणात मतदान होऊ शकले नाही. यातील सांगली, मिरज आणि पलूस-कडेगाव येथील पराभव सर्वात लाजीरवाणे म्हणून गणले गेले.
याठिकाणी पक्षीय ताकदीच्या दहा टक्केही मते अधिकृत उमेदवारांना मिळू शकली नाहीत. विधानसभा निवडणूक संपल्यानंतरही पक्षाने या निकालांबाबत आणि झालेल्या पक्षविरोधी राजकारणाबाबत गांभीर्याने घेतले नाही.
सांगलीतील राष्ट्रवादीचे सुरेश पाटील आणि पलूस-कडेगाव मतदारसंघातील सुरेखा लाड यांना मिळालेली मते धक्कादायक होती. महापालिका निवडणुकीवेळी पक्षाच्या पदरात सांगली, मिरजेतून तब्बल ६0 हजार मते मिळाली होती. ही मते विधानसभा निवडणुकीत गेली कुठे, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला होता. राष्ट्रवादीचे अनेकजण छुप्या पद्धतीने भाजपच्या प्रचारात गुंतले होते. भाजपवर त्यांनी एकतर्फी प्रेम का केले? कोणाच्या सांगण्यावरून केले? असे अनेक प्रश्न अजूनही उपस्थित केले जात आहेत.
मदन पाटील यांच्या पराभवासाठी राष्ट्रवादी नेत्यांनी अधिकृत उमेदवाराच्या पाठीशी न राहता भाजपला सहकार्य करणे पसंत केले. त्यामुळे पक्षाची नामुष्की झाली. पक्षसंघटनेतून अशा दगाबाजी करणाऱ्या नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना हटवायचे झाले, तर संपूर्ण पक्षच रिकामा करावा लागेल, अशीही स्थिती आहे. तरीही अशा दगाबाजीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न पक्षीय स्तरावर नक्कीच झाल्याचा संशय बळावत आहे. म्हणूनच सांगली जिल्ह्यातील पराभवांबाबत अद्याप कोणाला विचारणाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे पक्षांतर्गत निवडीवेळी अशा दगाबाजीत गुंतलेल्यांना पुन्हा मानाचे पद मिळाले तरी आश्चर्य वाटणार नाही. गेल्या काही वर्षांपासून पक्षीय हितापेक्षा व्यक्तिगत द्वेष महत्त्वाचा मानून राजकारण झाल्याने पक्षवाढीला खीळ बसली आहे.

नगरसेवकांचे काय?
या नगरसेवकांनी सर्वाधिक मते मिळवून महापालिकेत प्रवेश केला, त्यांच्या प्रभागातील पक्षाची मते विधानसभेच्या निवडणुकीवेळी गेली कुठे, असा सवाल विधानसभेनंतर वारंवार उपस्थित होत आहे. पक्षाच्या एकाही नेत्याला याचे उत्तर देता आले नाही. मोदी लाटेचे कारण सांगून ते नामानिराळे होताना दिसतात.


दिनकरतात्यांचा गाजावाजा
दिनकर पाटील यांनी लोकसभेला उघडपणे भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा दिला. त्यावेळी पक्षातील अन्य पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर उघड आणि छुप्या पद्धतीने टीका केली. प्रदेश कार्यकारिणीकडेही तक्रारी केल्या. ज्यांनी लेखी आणि तोंडी स्वरुपात तक्रारी केल्या त्याच नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी विधानसभेला छुप्या पद्धतीने पुन्हा दिनकर पाटील यांच्यासारखाच भाजपला पाठिंबा दिला. त्यांच्या कृतीचा गाजावाजा मात्र झाला नाही.

Web Title: What will the five-nation nationalist leaders of the riot?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.