कागदावरचा निकाल काही असला तरी निवडणुकाच निकाल ठरविणार : आदित्य ठाकरे

By दीपक शिंदे | Published: January 10, 2024 10:03 PM2024-01-10T22:03:35+5:302024-01-10T22:03:59+5:30

ईडीची कारवाई व तुरुंगात जाण्यापासून वाचविण्यासाठी गद्दारांच्या प्रमुखाने हे कृत्य केले असल्याचा आरोप शिवसेना युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केला.

Whatever the result on paper, elections will decide the result: Aditya Thackeray | कागदावरचा निकाल काही असला तरी निवडणुकाच निकाल ठरविणार : आदित्य ठाकरे

कागदावरचा निकाल काही असला तरी निवडणुकाच निकाल ठरविणार : आदित्य ठाकरे

सणबूर : कागदावरचा निकाल काहीही लागला असला तरी २०२४ च्या निवडणुकीतील निकाल जनताच ठरवेल, विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांच्याकडून काय अपेक्षा करणार? अगोदरच सर्व ठरल्याप्रमाणे झाले. ईडीची कारवाई व तुरुंगात जाण्यापासून वाचविण्यासाठी गद्दारांच्या प्रमुखाने हे कृत्य केले असल्याचा आरोप शिवसेना युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केला.

तळमावले, ता. पाटण येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी शिवसेना उपनेते नितीन बानगुडे पाटील, सातारा शिवसेना जिल्हाप्रमुख हर्षद कदम, पाटण तालुका शिवसेनाप्रमुख सचिन आचरे, शिवसेना जिल्हा उपप्रमुख सचिन मोहिते, माजी पंचायत समिती सदस्य सुरेश पाटील, महिला आघाडी प्रमुख अनिता जाधव, शिवसेना उपजिल्हाप्रमुख नितीन काशीद यांची प्रमुख उपस्थिती होती.

आदित्य ठाकरे म्हणाले, खोक्याचे राजकारण करून सरकार पाडणाऱ्या ४० गद्दारांना धडा शिकविण्यासाठी जनतेने सज्ज राहावे. या खोके सरकारने महाराष्ट्रामध्ये एक तरी उद्योग आणला का? महाराष्ट्रात असलेले उद्योग बाहेर केंद्र सरकारच्या माध्यमातून गुजरातमध्ये नेण्यामध्ये त्यांनी धन्यता मानली. केंद्र सरकारने महाराष्ट्रावर नेहमीच अन्याय केला असून, महाराष्ट्राचे सर्व क्षेत्रांत योगदान असतानादेखील महाराष्ट्र देशातच नाही, अशी वागणूक केंद्राकडून दिली जात आहे. केंद्राचा महाराष्ट्रावर एवढा राग का आणि कशासाठी, असा प्रश्न जनतेने या खोके सरकारला विचारायला हवा.

आंदोलने करणाऱ्यावर लाठीचार्ज केला जातो, हे कोणाच्या सांगण्यावरून होतो. हिंमत नसलेले सरकार फक्त आश्वासनापलीकडे काहीच करू शकत नाही, असे सांगून ते म्हणाले, आमचा मतदारसंघ तालुका व जिल्ह्यापुरता मर्यादित नसून तो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे. त्यामुळे हे गद्दार आमच्यावर खोटे आरोप करत आहेत. हे असले गद्दार आमदार आपणाला चालणार का, असेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकांत माने यांनी केले. प्रास्ताविक व स्वागत शिवसेना जिल्हाप्रमुख हर्षद कदम यांनी केले तर शिवसेना तालुकाप्रमुख सचिन आचरे यांनी आभार मानले. कार्यक्रमास शिवसैनिक, महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Whatever the result on paper, elections will decide the result: Aditya Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.