व्हॉट्अॅपवरील मैत्री बँड व्यावसायिकाला भोवली, ९ लाखांचा ऐवज लाटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 29, 2020 06:03 PM2020-02-29T18:03:46+5:302020-02-29T18:06:49+5:30
व्हॉट्सअॅपवर मैत्री करून एका युवतीने बँड व्यावसायिकाला ठोसेघरला फिरण्यासाठी नेले. या ठिकाणी अचानक संबंधित युवतीच्या कथित भावांची एन्ट्री होऊन बँड व्यावसायिकाचे त्यांनी अपहरण केले. विविध ठिकाणी फिरवून बँड व्यवसायाकडून अडीच लाखांची रोकड, पाच अंगठ्या आणि कार घेऊन संबंधित टोळक्याने पलायन केल्याची खळबळजनक घटना गुरुवारी सायंकाळी उघडकीस आली. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात एका युवतीसह पाचजणांवर खंडणी, अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा : व्हॉट्सअॅपवर मैत्री करून एका युवतीने बँड व्यावसायिकाला ठोसेघरला फिरण्यासाठी नेले. या ठिकाणी अचानक संबंधित युवतीच्या कथित भावांची एन्ट्री होऊन बँड व्यावसायिकाचे त्यांनी अपहरण केले. विविध ठिकाणी फिरवून बँड व्यवसायाकडून अडीच लाखांची रोकड, पाच अंगठ्या आणि कार घेऊन संबंधित टोळक्याने पलायन केल्याची खळबळजनक घटना गुरुवारी सायंकाळी उघडकीस आली. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात एका युवतीसह पाचजणांवर खंडणी, अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सुधाकर बाबूराव गेजगे (वय ४३, रा. माळवाडी, लाटे, ता. बारामती) यांचे बँड पथक आहे. ४ डिसेंबरला त्यांच्या व्हॉट्अॅपर एका युवतीचा मेसेज आला. त्या युवतीने त्यांना तुम्हाला भेटायचे आहे, असे सांगितले. त्यानुसार संबंधित युवतीने सातारा बसस्थानकात त्यांना भेटण्यासाठी बोलावले.
६ डिसेंबर २०१९ रोजी सुधाकर गेजगे हे सातारा बसस्थानकात आले. त्यावेळी संबंधित युवतीने आपण फिरायला ठोसेघरला जाऊ, असे सांगितले. त्यामुळे दोघेही कारने ठोसेघरला गेले. तेथे गेल्यानंतर संबंधित युवतीने लॉज बूक केला. त्या लॉजवर दोघे थांबले असतानाच माझा बाहेर दादा आलाय, असे त्या युवतीने गेजगेंना सांगितले.
चारजण अचानक लॉजमध्ये आले. त्यांनी माझ्या बहिणीसोबत काय करतोय, असे म्हणत गेजगेंना मारहाण केली. त्यांच्याच कारमधून गेजगेंना कोरेगावला नेले. या ठिकाणी आणखी एक युवक आला. त्या युवकानेही गेजगेंना मारहाण केली. त्यांच्याकडून ५ सोन्याच्या अंगठ्या, २ लाख ५६ हजारांची रोकड आणि त्यांची कार घेऊन त्यांनी पलायन केले.
या प्रकारानंतर गेजगे यांनी कोठेही वाच्यता केली नाही. भीतीपोटी त्यांनी हा प्रकार पोलिसांनाही सांगितला नाही. दरम्यान, दहिवडी परिसरामध्ये काही दिवसांपूर्वी मारामारी झाली होती. त्या ठिकाणी संबंधित हल्लेखोर कार घटनास्थळी ठेवून पसार झाले होते. दहिवडी पोलिसांनी कार मालकाचा शोध घेतल्यानंतर गेजगे यांचे नाव समोर आले.
पोलिसांनी त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्यांच्या बाबतीत घडलेला प्रकार त्यांनी पोलिसांसमोर कथन केला. त्यानंतर गेजगे यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. यावरून पैलवान उर्फ नितीन खरात, अनिल मदने (रा. पुसेगाव, ता. खटाव), सनीदेव खरात (रा. शिंदी, ता. माण), मुन्ना मुन्ना (रा. खातगुण, ता. खटाव, जि. सातारा) यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. हे सर्व संशयित फरार झाले आहेत, असे पोलिसांनी सांगितले.