Satara: रेल्वेच्या रिकाम्या ऑइल टँकरची चाके घसरली, पुणे-मुंबईकडील वाहतूक विस्कळीत
By प्रगती पाटील | Published: December 16, 2023 04:12 PM2023-12-16T16:12:17+5:302023-12-16T16:12:37+5:30
कोयना, मैसूर हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस दीड तास विलंबाने
कोरेगाव : पुणे-मिरज लोहमार्गावर कोरेगाव आणि सातारा रेल्वे स्थानकांदरम्यान तांदूळवाडीनजीक असलेल्या खिंडीजवळ शनिवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास मिरजेहून मुंबईकडे जाणाऱ्या रिकाम्या ऑईल टँकरची चाके रूळावरून घसरली. सातारा आणि पुणे दिशेने जाणारी वाहतूक विस्कळीत झाली. मात्र, मिरज व कोल्हापूरच्या दिशेने येणाऱ्या वाहतुकीवर कोणताही परिणाम झाला नाही. कोयनासह मैसूर हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस तब्बल एक ते दीड तास विलंबाने धावत होत्या.
डाऊन मार्गावर पर्यायी व्यवस्था करण्यात आली. कोरेगावकडून साताराच्या दिशेने जात असताना तांदूळवाडी गावानजीक रिकाम्या ऑईल टँकरची चाके रूळावरून घसरली. त्यामुळे पुणे आणि मुंबई मार्गांवरील वाहतूक चांगलीच विस्कळीत झाली. ऑईल टँकरची चाके रूळावरून बाजूला काढून मार्ग पुन्हा एकदा सुरू करण्यास खूप वेळ जाण्याची शक्यता आहे.
त्यासाठी मिरज येथून क्रेन पाठवण्यात येणार आहे. तोपर्यंत पुणे, मुंबईच्या दिशेने भारतात विविध ठिकाणी जाणाऱ्या गाड्या थांबवल्या आहेत. काही एक्सप्रेस या अपघातामुळे रखडल्या आहेत. मात्र, मिरज, कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या वाहतुकीवर याचा परिणाम झाला नाही. अपघातस्थळी आणि कोरेगाव रेल्वे स्थानकावर मध्य रेल्वेचे विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी तळ ठोकून आहेत.
मिरजेहून मुंबईकडे जाणाऱ्या दुसऱ्या रिकाम्या ऑइल टँकरचे इंजिन कोरेगाव स्थानकावर सोडविण्यात आले. ते इंजिन तांदूळवाडी येथे नेऊन अपघातग्रस्त ऑईल टँकर सोडून अन्य शिल्लक असलेले रिकामे ऑइल टँकर कोरेगाव स्थानकावर आणण्याचे रेल्वेच्या तांत्रिक विभागाच्या अधिकाऱ्यांचे प्रयत्न सुरू होते.