शाळकरी मुलांची वाहतूक करणाऱ्या रिक्षाचे चाक निखळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2019 04:33 PM2019-07-25T16:33:40+5:302019-07-25T16:35:56+5:30
शाळकरी मुलांची वाहतूक करणाऱ्या भरधाव रिक्षाचे चाक निखळल्याने शाळकरी मुलांसह नागरिकांच्या काळजाचा थरकाप उडाला. मात्र, रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांनी धाव घेऊन रिक्षाला हातभार लावल्याने मोठा अनर्थ टळला.
सातारा : शाळकरी मुलांची वाहतूक करणाऱ्या भरधाव रिक्षाचे चाक निखळल्याने शाळकरी मुलांसह नागरिकांच्या काळजाचा थरकाप उडाला. मात्र, रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांनी धाव घेऊन रिक्षाला हातभार लावल्याने मोठा अनर्थ टळला.
याबाबत अधिक माहिती अशी,लहान मुलांची शाळा सुटल्यानंतर एक रिक्षाचालक पाच-सहा मुले घेऊन रिक्षातून घरी सोडण्यासाठी निघाला होता. समर्थ मंदिरहून राजवाड्याकडे येत असतानाच गोल मारूती मंदिराजवळ भरधाव रिक्षाचे उजव्या बाजूचे पाठीमागील चाक अचानक निखळले.
चाक बाजूला तीव्र उतारावरून गडगडत गेल्यामुळे मधल्या रॉडवर रिक्षा घासत काही अंतर पुढे गेली. ही घटना घडली त्यावेळी रस्त्यावर वर्दळ होती. हा अपघात पाहून नागरिकांच्या काळजाचा अक्षरश: थरकाप उडाला. रिक्षातील मुलांनी आरडाओरड केल्यामुळे काही नागरिकांनी तत्काळ धाव घेऊन रिक्षाला हातभार लावला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
रिक्षा चालकाने या अपघातानंतर रिक्षाची अन्य दोन चाके तपासली असता या दोन्ही चाकांचेही नटबोल्ट सैल झाल्याचे त्याच्या निदर्शनास आले. जाणूनबुजून कोणीतरी खोडसाळपणे हा प्रकार केला असावा, अशी शंका रिक्षा चालकाने यावेळी व्यक्त केली. चालकाने पुन्हा रिक्षाला चाक बसवून मुलांना सुखरूप घरी सोडले.