जेव्हा कुंपणच शेत खाते...कशी राखण करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:38 AM2021-05-14T04:38:47+5:302021-05-14T04:38:47+5:30
सातारा सातारा जिल्ह्यात दररोज कोविडबाधित रुग्णांचा उच्चांक सुरू आहे. प्रशासनाने घातलेले नियम पायदळी तुडविण्याचा हा प्रकार म्हणजे बंदी घातली ...
सातारा
सातारा जिल्ह्यात दररोज कोविडबाधित रुग्णांचा उच्चांक सुरू आहे. प्रशासनाने घातलेले नियम पायदळी तुडविण्याचा हा प्रकार म्हणजे बंदी घातली आहे, ती तोडण्यासाठीच, अशा अविर्भावात आहे. अत्यावश्यक नसलेल्या दुकानांमधूनही चोचले पुरविण्यासाठी काहीजण अर्जव करत आहेत. घरपोच सेवेसाठी प्रशासनाने सूट दिली असली, तरी काहीजण दुकानाच्या दारातच ठिय्या मांडत आहेत. चौका-चौकात पोलीस उभे असताना, गल्ल्यांमधून दुकाने उघडली जात आहेत. हे धाडस कशातून येते. कारण काही ठिकाणी तर पोलीसच लाभार्थी असल्याचे पाहायला मिळते. हे म्हणजे कुंपणानेच शेत खाण्यासारखा प्रकार आहे.
जिल्ह्यात वाढत जाणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येला जबाबदार कोण? असा प्रश्न एकदा स्वत:ला विचारून तर पाहा. एका बाजूला कोरोनाबाधितांचे प्रमाण कमी होत नाही म्हणून खंत व्यक्त करायची आणि दुसरीकडे आपणच नियम तोडायचे. कोरोना हटवायचा ठेका काही फक्त प्रशासनाने घेतलेला नाही, त्याला सर्व सातारकरांचेही सहकार्य हवे आहे. पण, आपणच नियम पाळले नाहीत, तर बाधितांची संख्या कमी कशी होणार. याचेही भान सातारकरांना राहिलेले नाही. पोलिसांनी दंडुका उगारला की, अनेकांना राग येतो. वरिष्ठांचे फोन येतात; पण आपल्यामुळे कितीजण बाधित होत आहेत, याची जाणीव आपल्याला नाही का
लोकांनी बाहेर पडू नये यासाठी चौका-चौकात पोलीस आहेत. कोणीही दुकाने न उघडता लोकांना घरपोच सेवा द्यावयाची आहे. जिल्हाधिकारी यांनी असा नियम सांगितला आहे. पण, प्रत्यक्षात लोक दुकानदारांच्या दारातच येत आहेत. त्यामुळे शटर बंद असले, तरी या शटरआडून साहित्याचा पुरवठा होत आहे. हे सर्व पोलिसांच्या समक्ष होत आहे. पोलिसांची गाडी येते आणि मुख्य रस्त्यावरून फिरुन जाते. पण, गल्लीत काय सुरू आहे, याची कल्पनाच कोणाला नाही. कारण सर्वसामान्यांबरोबर यातील लाभार्थी काही पोलीस आणि शासकीय कर्मचारीही आहेत. त्यामुळे जर या सर्वांनीच अशापद्धतीने वागायचे ठरविले, तर चेन तोडणार कोण आणि बाधितांची संख्या कमी होणार कशी.
चौकट
व्यापाऱ्यांची घरपोच सेवेची अडचण
प्रशासनाने लोकांना सकाळी ७ ते ११ या वेळेत घरपोच सेवा द्या, असे सांगितले असले, तरी व्यापारी आणि किराणा माल दुकानदारांना ते शक्य होत नाही. काही दुकानांमध्ये एक ते दोन कामगार आहेत. काही दुकानात मालकच सर्व काम करतात. अशावेळी साहित्याची यादी काढायची कधी आणि घरपोच करायची कधी. त्यांना हे अशक्य असल्याने लोकांना दुकानापर्यंत येण्याशिवाय पर्याय नाही. यामुळे व्यापारी घरी नाही आणि ग्राहक दुकानापर्यंत पोहोचतोय.
चौकट
प्रशासन कोणकोणत्या पातळीवर लढणार
कोरोनाबाधित रुग्णांना ऑक्सिजन, रेमडेसिविर, व्हेंटिलेटर बेड वाढविणे, हॉस्पिटलची संख्या वाढविणे अशा पातळीवर काम करायचे का, नागरिकांवर लक्ष ठेवत नियम न पाळणाऱ्यांवर कारवाई करायची, अशा अवस्थेत प्रशासन आहे. सर्वांकडून सहकार्य झाले तरच कोरोना विरोधातील ही लढाई जिंकता येईल. गतवेळच्या अनुभवावर तरी सर्वांनी सहकार्य केले पाहिजे. कारण सध्याची स्थिती जास्त गंभीर झाली आहे. याचीही जाण ठेवावी लागेल.