लिहिता हात जेव्हा ‘देता’ होतो...
By admin | Published: November 21, 2014 09:06 PM2014-11-21T21:06:23+5:302014-11-22T00:16:58+5:30
खंडाळ्याचा सुपुत्र : संवेदनशील साहित्यिकाने कुष्ठरोग्यांसाठी वेचले जीवन
दशरथ ननावरे - खंडाळा
‘का जडला हा भोग मजला
का जडली ही विदीर्ण व्याधी
दिसले माझे मरणच मजला
जीवन जगण्याआधी...’
समाजातल्या कुष्ठरोग्यांची ही दयनीय व्यथा... कुष्ठरोगी दिसताच नाक मुरडून कोसो दूर पळण्याची प्रत्येकाचीच मानसिकता; पण अशा काळातही रोग्यांच्या चेहऱ्यावरची वेदना पाहून भावना हेलावून गेल्या आणि त्यांच्या जीवनात सुखाची वाट दाखविण्यासाठी अंत:प्रेरणेतून पुढे सरसावले ते खंडाळ्याचे सुपुत्र आणि साहित्यिक विलास वरे! एकीकडे साहित्यिक म्हणून अनेक पुस्तकांची पाने आपल्या सिद्धहस्त लेखणीतून साकारताना दुसऱ्या बाजूला तेच हात कुष्ठरोग्यांचे साथी बनले. केवळ कुष्ठरोग्यांची सेवाच नाही, तर त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी आपल्या आयुष्याची कमाई खर्ची घालून त्यांचे समाजाअंतर्गत पुनर्वसन करण्याचे महनीय काम साकारले. समाजाच्या दृष्टीने कुष्ठरोग्यांसाठी ते संजीवक बनले. समाजातल्या पीडित कुष्ठरोग्यांना जीवनाची ‘प्रकाश वाट’ दाखविणाऱ्या आणि आपल्या लेखणीतून जगण्याची नवी उभारी देणाऱ्या या प्रामाणिक, निष्ठावंत, समाजसेवकाचा यशवंतराव चव्हाण साहित्यिक गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
स्वत:च्या संसाराची तमा न बाळगता कुष्ठरोग्यांनाच आपले कुटुंब मानून महिन्याच्या पगारातून घरखर्च भागवून उर्वरित रक्कम व पत्नीने मजुरी करून कमावलेले पैसे रोग्यांच्या सेवेसाठी खर्च करून त्यांना जीवनात स्वावलंबी बनवून समाजाअंतर्गत पुनर्वसन करून मानाचे स्थान मिळवून दिले. प्रत्येक वर्षी भेटतील त्या कुष्ठरोग्यांना स्वत:च्या मुलांप्रमाणे सांभाळून सेवा केली. स्वत:च्या पोटी जन्मलेले मूल नसले म्हणून काय झाले? ‘अवघे विश्वची माझे घर’ या संत ज्ञानेश्वर माउलींच्या उक्तीला कुष्ठरोग्यांचा सांभाळ करून यथार्थ रूप देण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर कुणाला शेळ्या पालनासाठी, कुक्कुट पालनासाठी शेतीपूरक व्यवसाय, बुरुड काम, म्हैस पालन, चर्मोद्योग, गवंडीकाम, गोंधळी व्यवसाय, टी-स्टॉल, किराणा दुकान अशा विविध प्रकारे उद्योग स्वखर्चाने उभे करून देऊन स्वावलंबी बनविले.
बंडा घोडके नावाच्या एका कुष्ठरोग्याची तर अखंड सेवा केली. अगदी त्याच्या मृत्यनंतर अंत्यसंस्काराला कोणीच पुढे आले नाही, अशावेळी स्वत:च त्यांच्यावर अंत्यसंस्कार करून कर्तव्य पार पाडले. असे एक ना अनेकांचे संसार उभे करण्याचे काम त्यांनी केले.
एकीकडे कुष्ठरोग्यांच्या सेवेचं व्रतस्थ काम सुरू असतानाच नोकरी सांभाळत दुसऱ्या बाजूने साहित्यदेवतेची पूजाही चालूच ठेवली. लेखणाच्या आवडीतून लेखक बनले. कुष्ठरोग्यांना जगण्याची प्रेरणा मिळावी, यासाठी ‘ध्येयांतर’, भावनांतर, जीवनांतर, प्रेमांतर, देशांतर आणि प्रस्थान’ अशा कादंबऱ्याही लिहिल्या आहे. काही पुस्तकांमधून रोग्यांचे जीवनचरित्रच सांगणाऱ्या आहेत. त्याचबरोबर अनेक विषयांवरील एकोणवीस पुस्तके त्यांची प्रकाशित झाली आहेत. साहित्यक्षेत्रातील उज्ज्वल कामगिरीबद्दल अनेक पुस्तकांना, समाजसेवेबद्दल त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. यामध्ये महाराष्ट्र साहित्य परिषद पुरस्कार, स्वातंत्र्यसैनिक दादासाहेब साखवळकर सेवा पुरस्कार, आचार्य अत्रे कादंबरी भूषण पुरस्कार, मानवता सेवाभूषण पुरस्कार यांसह त्यांच्या कार्याबद्दल अनेकदा गौरव व सत्कारही झाले आहेत.
साहित्यक्षेत्रातील योगदानाबद्दल फलटण येथील मराठी साहित्य परिषदेच्या वतीने त्यांना यशवंतराव चव्हाण साहित्यिक पुरस्कार जाहीर झाला आहे. त्याचे वितरण दि. २५ रोजी होणार आहे. शासकीय सेवेत असताना कुष्ठरोग्यांसाठी केलेल्या कामाने आयुष्यात पुन्हा परतलेल्या शेकडो लोकांची सदुभावनेने येणारी पत्रे आजही त्यांना पुरस्कारा इतकीच अनमोल वाटतात.
स्वत:च्या आयुष्याचा उत्कर्ष व्हावा, कुटुंबाला उंच भरारी घेता यावी, यासाठी सारेचजण झटत असतात; परंतु १९८३ मध्ये जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात सेवेत दाखल झाल्यापासून केवळ नोकरी हा चरितार्थाचा भाग म्हणून न पाहता समाजाचे दायित्व म्हणून समाजसेवेचे व्रत विलास वरे यांनी जोपासले. १९८३ मध्ये कुष्ठरोगतज्ज्ञ म्हणून काम करताना कुष्ठरोग्यांच्या सेवेची लहर मनाला कधी शिवली हे त्यांना कळलंच नाही. समाजातल्या शेकडो कुष्ठरोग्यांना आयुष्यात जगण्याची उभारी देताना त्यांच्या पत्नी सुनीता वरे यांनी नेहमीच प्रोत्साहन दिले.
पंढरीच्या वाटेवर सापडला जीवनमार्ग
१९८४ मध्ये पंढरीच्या वारीला निघालेल्या पालखी सोहळ्यातील एका वारकऱ्याने पाण्याच्या पिंपात हात घातला म्हणून अनेकजण त्याला मारहाण करीत होते. ते पाहताच वरे दाम्पत्यांनी पुढे होऊन त्याची सुटका केली. उदय नाव असलेल्या राजस्थानातील या तरुणाला कुष्ठरोग झाल्याचे त्यांना कळले. त्यांनी त्याला स्वत:च्या घरी नेले. त्याच्यावर योग्य उपचार केले. स्वत:च्या हातांनी जखमा धुतल्या. त्याची सेवा केली. एवढंच नाही तर तो बरा झाल्यानंतर स्वखर्चाने त्याच्या अंगभूत असलेल्या कलई करण्याच्या कलेला वाव देत व्यवसाय उभा करून दिला. घरच्यांसह समाजातल्या लोकांनी हाकलून दिलेल्या या युवकाच्या जीवनाचा खऱ्याअर्थाने उदय केला.
तिथंपासून विलास वरे हे कुष्ठरोग्यांचे खरे डॉक्टर बनले.