घरी भेटण्यास आल्यावर दरोड्यातील आरोपीला पकडले
By नितीन काळेल | Published: July 28, 2023 08:01 PM2023-07-28T20:01:56+5:302023-07-28T20:07:50+5:30
शाहूपुरी पोलिसांची कारवाई : सातारा शहरातील सात महिन्यांपूर्वीचा गुन्हा.
नितीन काळेल, लोकमत न्यूज नेटवर्क, सातारा : सातारा शहरातील सात महिन्यांपूर्वीच्या दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला शाहूपुरी पोलिसांनी सापळा लावून अटक केली. अदित्य बनसोडे असे त्याचे नाव असून त्याला शहराजवळील वनवासवाडी येथे घरी भेटण्यासाठी आल्यावर पकडले.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मागीलवर्षी डिसेंबर महिन्यात सातारा शहरातील कला व वाणिज्य महाविद्यालय परिसरात एकाला कोयत्याचा धाक दाखवून त्याच्याकडून रोख रक्कम जबरदस्तीने काढण्यात आली होती. याप्रकरणी संशयितांच्याविरोधात शाहूपुरी पोलिस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा नोंद झाला होता. यामध्ये अदित्य बनसोडे (रा. वनवासवाडी, सातारा) असे एकाचे नाव होते. याप्रकरणी शाहूपुरीचे पोलिस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी फरार आरोपीला पकडण्यासाठी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत बधे व पथकाला सूचना केली होती. तर गुन्हा दाखलपासून अदित्य बनसोडे फरार होता. सतत वास्तव्य बदलून तो राहत होता. फरार आरोपींचा शाेध घेतानाच शाहूपुरी पोलिसांना फरार अदित्य बनसोडे हा वनवासवाडीत घरी भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी सापळा लावून घराच्या परिसरात येताच त्याला ताब्यात घेतले.
या कारवाईत पोलिस निरीक्षक धनंजय फडतरे, सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत बधे, हवालदार सुरेश घोडके, मनोज मदने, नीलेश काटकर, महेश बनकर, अभय साबळे, सचिन पवार, स्वप्नील सावंत, स्वप्नील पवार, सुमीत मोरे आदींनी सहभाग घेतला.