पण स्मारक कधी?----‘जीवा’ची बाजी...
By admin | Published: December 19, 2014 09:19 PM2014-12-19T21:19:03+5:302014-12-19T23:33:58+5:30
अशासकीय सदस्यांची मागणी : समिती सदस्यांसह अखिल भारतीय जीवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली अधिकाऱ्यांशी भेट
सातारा : ‘हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीत मोलाचे योगदाने देणारे वीर जीवा महाले यांचे स्मारक लवकरात लवकर उभे राहावे, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात संबंधित शासकीय अधिकारी तसेच समितीची बैठक बोलवावी, अशी मागणी वीर जीवा महाले स्मारक समितीतील अशासकीय सदस्य अशोक जाधव यांनी केली आहे.
प्रतापगडाच्या पायथ्याला अफझलखानाच्या वधाच्या वेळी सय्यद बंडाने छत्रपती शिवाजी महाराजांवर वार केला होता. हा वार अलगद झेलणारे जीवा महाले यांचा पराक्रम मोठा आहे. या शूरवीराचे स्मारक उभारावे यासाठी ‘लोकमत’ने ‘जीवा’ची बाजी; पण स्मारक कधी? ही वृत्तमालिका प्रसिद्ध केली होती. शासनाने स्थापन केलेल्या वीर जीवा महाले स्मारक समितीतील अशासकीय सदस्य तसेच अखिल भारतीय जीवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी प्रतापगड पायथ्याला असलेल्या नवीन जागेची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी महाबळेश्वर तहसील कार्यालयात भेट दिली.
यावेळी स्मारक समितीतील अशासकीय सदस्य अशोक जाधव म्हणाले, ‘वीर जीवा महाले यांच्या प्रलंबित स्मारकासाठी निधीही उपलब्ध झाला आहे. केवळ जागा निश्चितीअभावी ते रखडत चालले आहे. याची जबाबदारी प्रशासनाला टाळता येणार नाही. प्रतापगडाच्या पायथ्याला वाडा कुंभरोशी येथे सुचविलेल्या सोळा गुंठे जागेत स्मारक करायला हरकत नाही; पण हा निर्णय लवकरात लवकर लावण्यात यावा.’
यावेळी समितीतील दुसरे अशासकीय सदस्य जिल्हा परिषदेचे माजी सदस्य धोंडिराम जाधव, अखिल भारतीय जीवा सेनेचे सदस्य बंटी शेळके, कृष्णाजी निमगले, राकेश क्षीरसागर, पद्माकर जाधव आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
नाभिक संघटनेकडून ‘लोकमत’चे आभार
वीर जीवा महाले यांचे स्मारक व्हायलाच हवे, या मागणीसाठी ‘लोकमत’ने ‘जीवा’ची बाजी; पण स्मारक कधी’ ही वृत्त मालिका प्रसिद्ध केली.
या मालिकेनंतर प्रशासनाने हालचाली गतिमान केल्या आहेत,’ अशा शब्दांत सातारा येथील नाभिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाऊ दळवी यांनी ‘लोकमत’चे कौतुक केले.
यावेळी जिल्ह्यातील सर्वच सलून दुकानात ‘लोकमत’ ग्राहकांना वाचनासाठी ठेवला जाईल, असेही ते म्हणाले.
४यावेळी शहराध्यक्ष लक्ष्मण जाधव, संतोष साळुंखे, शैलेश सावंत, चंद्रकांत इंगळे, अरुण खैरे, तानाजी जाधव, राजेंद्र जाधव आदी उपस्थित होते.
सातारा येथील ‘लोकमत’ कार्यालयात नाभिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी भेट दिली. यावेळी संतोष साळुंखे व भाऊ दळवी यांनी ‘लोकमत’चे संस्थापक संपादक जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला.