Satara: भूस्खलनामुळे उशाशी मरण घेतलेल्या हुंबरळीचे पुनर्वसन कधी ?
By नितीन काळेल | Published: August 14, 2024 06:33 PM2024-08-14T18:33:11+5:302024-08-14T18:33:32+5:30
ग्रामस्थ आक्रमक: शासनदरबारी विनंती करुनही दुर्लक्ष; आरपारच्या लढाईचा निर्धार
सातारा : भूस्खलनमुळे गेले तीन वर्षे उशाला मरण घेऊन राहणाऱ्या हुंबरळी ग्रामस्थांनी कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी अनेकवेळा शासन दरबारी अर्ज, विनंत्या केल्या. पण, याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे प्रशासन आमच्या मरणाची वाट पाहतेय का ? असा संतप्त सवालही ग्रामस्थांनी केला. परिणमाी आता ग्रामस्थांनी स्वातंत्र्यदिनी बेमुदत उपोषणाचा निर्णय घेतला असून आरपारच्या लढाईचाही निर्धार केला आहे.
२०२१ मधील जुलै महिन्यात जिल्ह्यातील पश्चिम भागात अतिवृष्टी झाली होती. त्यावेळी २१ जुलै रोजी पाटण तालुक्यात भूस्खलनच्या घटना घडलेल्या. या भूस्खलनमध्ये कोयना विभागातील मिरगाव, ढोकावळे, हुंबरळी येथे भूस्खलन होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले. या नंतर या भूस्खलनग्रस्त ३ गावांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याबाबत तत्कालीन पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी मान्यता दिली होती. त्यानुसार या तिन्ही गावांचे कायमस्वरूपी १०० टक्के पुनर्वसन करण्याबाबत तत्कालीन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनीही शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता.
या प्रस्तावानुसार मिरगाव आणि ढोकावळे या गावातील सर्व बाधित कुटुंबांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याबाबत कार्यवाही सुरू आहे. मात्र, हुंबरळी गावात भूस्खलन झाले आहे. तरीही हुंबरळीच्या नावाखाली तेथीलच एक वाडीला पुनर्वसनामध्ये सहभागी करून घेण्यात आले. मात्र, २०२१ ला ज्या बाधित कुटुंबाचे नुकसान झाले त्यांना पुनर्वसनाच्या यादीत घेतले नाही. ज्यांचे एका पै चेही नुकसान झाले नाही अशा कुटुंबांना पुनर्वसनाचा लाभ देण्याचा प्रकार झाला आहे, असे आता ग्रामस्थ सांगत आहेत.
याबाबत बाधित झालेल्या हुंबरळी येथील कुटुंबांनी न्याय मागणीसाठी तीनवर्षे प्रशासनाचे उंबरोही झिजवले. मात्र, प्रशासनाला आमच्या न्याय मागणीकडे लक्ष देण्यास वेळ मिळत नाही, अशी खंतही ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. त्यामुळे हुंबरळी ग्रामस्थांनी आता आरपारच्या लढाईचा निर्धार केला आहे. यासाठी स्वातंत्र्यदिनापासून उपोषण सुरू करण्यात येणार आहे.
झारीतील शुक्राचार्य कोण ?
२०२१ मध्ये हुंबरळीचे भूस्खलनमध्ये नुकसान होऊनही गावाला कायमस्वरूपी पुनर्वसनापासून वंचित ठेवण्यात आले आहे. यामागील झारीतील शुक्राचार्य कोण आहे, असा सवालही ग्रामस्थ विचारात आहेत. तसेच तीन वर्षे मरण उशाला घेऊन २३४ कुटुंबे राहत आहेत. त्यामुळे पुन्हा भूस्खलन होऊन ग्रामस्थांच्या मरणाची वाट शासन बघत आहे का ? असा प्रश्नही विचारला जात आहे. तर याबाबत आम्हाला मरायचे नाही. आमच्या भावी पिढीसाठी जगायचे आहे, म्हणूनच स्वातंत्र्यदिनी लोकशाही मार्गाने गावाच्या स्वांतत्र्यासाठी सर्व ग्रामस्थ लढाईसाठी तयार आहेत, अशा आशयाचे निवेदनही ग्रामस्थांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच जिल्हाधिकाऱ्यांना पाठविले आहे.