कधी येणार कायद्याचे राज्य ?
By admin | Published: June 14, 2015 11:52 PM2015-06-14T23:52:35+5:302015-06-14T23:55:56+5:30
वाठार भागात चिंता : नव्या पोलीस अधिकाऱ्यांकडून अपेक्षा
वाठारस्टेशन : अवैध धंद्यांचे माहेरघर बनलेल्या वाठार पोलीस ठाणे परिसरात खुलेआम सुरू असलेली अवैध दारू विक्री, जुगार, वडाप वाहतुकीला कायमस्वरूपी आळा घालण्यात आजपर्यंत कोणत्याही अधिकाऱ्याला यश मिळाले नाही. आता नव्याने या पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारलेल्या अधिकाऱ्याकडून या भागातील सर्वसामान्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. या अपेक्षा हे अधिकारी पूर्ण करणार की ‘ये रे माझ्या मागल्या’ प्रमाणेच कामकाज चालणार याविषयी चर्चेला उधाण आले आहे.
वाठार पोलीसठाणे परिसरात एकूण ४७ गावांचा समावेश असून, २ सहायक पोलीस निरीक्षक या पोलीस ठाण्यासाठी मंजूर आहेत. या शिवाय या पोलीस ठाण्याअंतर्गत आदर्की फाटा येथे पोलीस चौकी बांधण्यात आली आहे. ही चौकी सध्या मद्यपींचे आश्रयस्थान बनली आहे. कित्येक दिवसांत या चौकीचे दरवाजेच उघडले नसल्याने ती केवळ नावापूरतीच अस्तित्वात आहे. अवैध व्यवसायामध्ये देऊर, अंबवडे (सं), वाघोली, पिंपोडे बुद्रुक, सोळशी, वाठारस्टेशन, भाडले खोऱ्यात खुलेआम अवैध दारूविक्री ही या भागाची नित्याचीच बाब आहे. आजपर्यंतच्या अधिकाऱ्यांसह पोलिसांकडून या भागातील व्यावसायिकांना अप्रत्यक्षपणे पाठबळ देण्याचेच काम सुरू होते.
दिवसेंदिवस खुनासारखे गंभीर गुन्हे या भागात घडू लागल्याने रात्रगस्त बंद असल्याने छोट्या-मोठ्या चोऱ्यांचेही प्रमाण अलीकडे वाढले आहे.
वाठार बसस्थानक परिसरात बसेसपेक्षा खासगी वडापचेच प्रमाण अधिक आहे. याठिकाणी कोणत्याही प्रकारचे नियोजन नसल्याने बाजारादिवशी पाकीटमारीचे प्रकारही घडत आहेत.यापूर्वीच्या अधिकाऱ्यांनी लावलेल्या सवयी मोडण्याची भूमिका घेऊन नवा कायदा अंमलात आणावा, हीच या सर्वसामान्य ग्रामस्थांची पोलिसांकडून अपेक्षा आहे. (वार्ताहर)