सातारा: सलग नऊ वर्षे भूस्खलन होणाऱ्या सवारवाडीचे पुनर्वसन कधी? पावसाळा आला की भरतेय धडकी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2022 03:39 PM2022-07-15T15:39:04+5:302022-07-15T15:39:32+5:30

मुला-बाळांना पै-पाहुण्यांकडे पाठवलंय. मायबाप सरकार आमच्या पुनर्वसनाकडे लक्षही देईना.

When will the villagers of Sawarwadi in Patan taluka be rehabilitated? | सातारा: सलग नऊ वर्षे भूस्खलन होणाऱ्या सवारवाडीचे पुनर्वसन कधी? पावसाळा आला की भरतेय धडकी

सातारा: सलग नऊ वर्षे भूस्खलन होणाऱ्या सवारवाडीचे पुनर्वसन कधी? पावसाळा आला की भरतेय धडकी

googlenewsNext

सातारा : ‘पावसाळा आला की मनात धस्स होतंय. सलग नऊ वर्षे वाडीच्या आजूबाजूनं भूस्खलन होतेय. यात आमची घरं कधी गुडूप होतील, हे सांगताही येणार नाही. यामुळं मुला-बाळांना पै-पाहुण्यांकडे पाठवलंय. मायबाप सरकार आमच्या पुनर्वसनाकडे लक्षही देईना. पावसाळ्यातील प्रत्येक रात्र आम्ही जागून काढतोय,’ हे हतबल झालेले उद्गार आहेत, पाटण तालुक्यातील सवारवाडीतील ग्रामस्थांचे.

पाटण तालुक्यातील तारळे भागातील कडवे बुद्रुक ग्रामपंचायतीअंतर्गत सवारवाडी हे गाव येते. ही वाडी डोंगरावर वसलेली आहे. तिला लागूनच भला मोठा कडा आहे. गेल्या नऊ वर्षांपूर्वी पहिल्यांदाच या कड्यामुळे गावकऱ्यांना चिंता लावणारी घटना घडली. कड्याच्या आजूबाजूने आणि गावच्या परिसरात भूस्खलन झाले. जमिनी खचल्या गेल्या. घरांना तडे गेले. या डोंगरावर इतक्या वर्षे गुण्यागोविंदाने राहणारे सवारवाडीतील ग्रामस्थ या भूस्खलनाने अक्षरश: हबकून गेले. प्रशासनातील काही अधिकारी, कर्मचारी पाहणी दाैऱ्यात आल्यासारखे आले आणि निघून गेले, ते आजपर्यंत फिरकलेच नाहीत. विशेष म्हणजे सलग नऊ वर्षे सवारवाडीत भूस्खलन होतंय. त्यामुळे पावसाळा आला की ग्रामस्थांच्या मनात धडकी भरते. एखाद्या पावसाळ्यात होत्याचं नव्हतं होईल, अशी धास्तीही ग्रामस्थांना लागलीय.

या मधल्या काळात ग्रामस्थांनी पुनर्वसनासाठी शासनदरबारी अनेकदा उंबरठे झिजवले. मात्र, निवेदन स्वीकारण्याव्यतिरिक्त प्रशासनाकडून काहीच हालचाली झाल्या नाहीत. २५ ते ३० घरांचा उंबरठा असलेल्या या सवारवाडीत सध्या भयभीत वातावरण आहे. आत्तापर्यंत भूस्खलन होऊन नऊ वर्षे झाली. त्यामुळे इथून पुढे वाडीवर कोणते संकट ओढवेल, या चिंतेने ग्रामस्थांनी आपल्या मुला-बाळांना पै-पाहुण्यांकडे पाठवले आहे; तर काहीजण साताऱ्यामध्ये येऊन राहिले आहेत. जिल्हा प्रशासनानं आमचं पुनर्वसन तातडीनं करावं, असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. केवळ पावसाळा आला की, पुनर्वसनाची आठवण नको. आमच्या जिवाचा विचार करा, असं हतबल होऊन ग्रामस्थ सांगताहेत.

पाटणच्या तहसीलदारांना उपजिल्हाधिकाऱ्यांचे पत्र

निवासी उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे यांनी पाटणच्या तहसीलदारांना ६ सप्टेंबर २०२१ रोजी शासकीय पत्र पाठवले आहे. या पत्रामध्ये त्यांनी म्हटले आहे की, सवारवाडी, पो. कडवे बुद्रुक, ता. पाटण, जि. सातारा या वाडीचे भूस्खलन हे गेल्या नऊ वर्षांपासून होत आहे. वारंवार अर्ज-निवेदन देऊनही सवारवाडीचे कायमस्वरूपी पुनर्वसन झाले नाही. पुनर्वसन करण्याबाबत ग्रामस्थांचा अर्ज प्राप्त झाला आहे. या अर्जावर योग्य ती कार्यवाही करून या गावची स्थळपाहणी करून अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा.

Web Title: When will the villagers of Sawarwadi in Patan taluka be rehabilitated?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.