मनोमीलनाची "शिट्टी" कधी वाजणार अन् "नारळ" कधी फुटणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:29 AM2021-05-29T04:29:01+5:302021-05-29T04:29:01+5:30
कराड यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची धांदल सध्या जोरात सुरू आहे. सत्ताधारी सहकार पॅनेलचे नेते डॉ. सुरेश ...
कराड
यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची धांदल सध्या जोरात सुरू आहे. सत्ताधारी सहकार पॅनेलचे नेते डॉ. सुरेश भोसले यांना थोपवण्यासाठी त्यांचे विरोधक असणाऱ्या डॉ. इंद्रजित मोहिते व अविनाश मोहिते यांच्या मनोमीलनासाठी बैठका सुरू आहेत. पण एकीकडे मनोमीलनाच्या चर्चेचे गुऱ्हाळ सुरू असताना, या दोघांनीही स्वतंत्रपणे अर्ज दाखल केले आहेत. इंद्रजित मोहिते यांनी शिट्टी, तर अविनाश मोहिते यांनी नारळ चिन्ह मागितले आहे. त्यामुळे मनोमीलनाची शिट्टी कधी वाजणार आणि नारळ कधी फुटणार? याबाबत साऱ्यांनाच उत्सुकता लागून राहिली आहे.
सातारा, सांगली जिल्ह्यातील काही तालुक्यांत कार्यक्षेत्र असणाऱ्या कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. एक जूनपर्यंत त्याची मुदत आहे .त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सत्ताधारी सहकार पॅनेलचे प्रमुख डॉ. सुरेश भोसले यांना थोपवण्यासाठी कार्यक्षेत्रातील महाविकास आघाडीचे नेते सरसावले आहेत. भोसलेंचे प्रतिस्पर्धी असणाऱ्या डॉ. इंद्रजित मोहिते, अविनाश माहिते या दोन पॅनेल प्रमुखांना एकत्रित करून निवडणूक लढण्यासाठी त्यांनी चंगच बांधला आहे.
डाॅ. इंद्रजित मोहिते व अविनाश मोहिते यांच्या एकत्रिकरणासाठी गत काही महिन्यांपासून वरिष्ठ नेत्यांचे प्रयत्न सुरू आहेत. सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी यात पुढाकार घेतला आहे .माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई, कोल्हापूर, कराड येथे आजवर सात ते आठ बैठका त्यांनी घडवून आणलेल्या आहेत. मध्यंतरी या दोन मोहित्यांच्या मनोमीलनाचा चेंडू थोरल्या पवारांच्या कोर्टात गेल्याच्याही बातम्या होत्या. पण तेथे नेमके काय झाले, हे समजू शकले नाही.
अखेर कोरोनामुळे लांबलेल्या कृष्णा कारखाना निवडणुकीचा कार्यक्रम २४ मे ला जाहीर झाला आहे. त्यामुळे राजकीय घडामोडी जोरदार सुरू झाल्या आहेत. इंद्रजित मोहिते, अविनाश मोहिते यांच्या संभाव्य मनोमीलनाच्या प्रक्रियेलाही गती आलेली आहे. कराडच्या शासकीय विश्रामगृहावर गेले तीन दिवस-रात्र बैठका सुरू आहेत. मनोमीलन जुळत आल्याचे निकटवर्तीय खासगीत सांगत आहेत. मात्र असे असताना गुरुवारी माजी अध्यक्ष अविनाश मोहिते यांनी आपल्या उमेदवारांचे पॅनेलच्यावतीने अर्ज दाखल केले आहेत. अर्जात त्यांनी नारळ हे चिन्हही मागितले आहे, तर शुक्रवारी माजी अध्यक्ष डॉ. इंद्रजित मोहिते यांनी आपल्या संभाव्य उमेदवारांसह आपला अर्ज दाखल केला आहे .त्यामुळे गेले तीन दिवस शासकीय विश्रामगृहावर सुरू असलेल्या मनोमीलनाच्या चर्चेचे काय? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
एका बाजूला मनोमीलनाबाबत चर्चा सुरू असताना दुसरीकडे या दोघांनीही आपल्या पॅनेलच्या माध्यमातून उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात केल्याने मनोमीलनाची शिट्टी कधी वाजणार? अन् मनोमीलनाचा नारळ कधी फुटणार? याबाबतची चर्चा दोन्हीकडील समर्थकांच्यात सुरू आहेत.
चर्चा सुरूच आहे ..
डॉ. इंद्रजित मोहिते व अविनाश मोहिते यांनी निवडणुकीसाठी आपापल्या पॅनेलच्या माध्यमातून उमेदवारी अर्ज दाखल केले असले, तरी मनोमीलनासंदर्भातील चर्चा अजूनही सुरूच आहे. यातून योग्य असा तोडगा लवकरच निघेल, असा विश्वास या प्रक्रियेत प्रत्यक्ष सहभागी असणाऱ्या एका नेत्याने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर व्यक्त केला.