..तर येरळा खळखळून वाहू लागेल

By admin | Published: January 15, 2016 11:06 PM2016-01-15T23:06:23+5:302016-01-16T00:24:51+5:30

प्रभाकर देशमुख : सेवागिरी यात्रेच्या सांगता कार्यक्रमात विश्वास व्यक्त; ट्रस्टकडून कर्मचाऱ्यांचा सत्कार

..when the Yerlah will have to flutter | ..तर येरळा खळखळून वाहू लागेल

..तर येरळा खळखळून वाहू लागेल

Next

पुसेगाव : ‘पडणाऱ्या पावसाचे पाणी हे आपल्या हक्काचे असून, जोपर्यंत या पाण्याचा थेंबन्थेंब साठवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न होत नाहीत, तोपर्यंत समाज पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होणार नाही. खटावसारख्या दुष्काळी भागात पाणी अडविण्याची खरी गरज ओळखून येथील श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टने सुरू केलेल्या येरळानदी पुनरुज्जीवन प्रकल्पास नदीकाठच्या गावातील लोकांनी खऱ्या अर्थाने साथ दिल्यास कोरडी येरळा नदी पुन्हा खळखळून वाहू लागेल,’ असा विश्वास राज्याचे जलसंधारण व रोहयो सचिव प्रभाकर देशमुख यांनी व्यक्त केला.सेवागिरी महाराजांच्या ६८ व्या पुण्यस्मरणानिमित्त पुसेगाव येथे दि. ४ ते १४ जानेवारी या कालावधीत भरविण्यात आलेल्या वार्षिक यात्रेच्या सांगता समारंभात ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, उपजिल्हाधिकारी पराग सोमण, मठाधिपती सुंदरगिरी महाराज, ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, विश्वस्त मोहनराव जाधव, डॉ. प्र. ल. भुजबळ, शिवाजीराव जाधव, विजय जाधव, अ‍ॅड. विजयराव जाधव, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन पाटील, बँक आॅफ महाराष्ट्र क्षेत्र साताराचे अंचल महाप्रबंधक अहिल थोरात, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.देशमुख म्हणाले, ‘गेल्या दोन वर्षांपासून या भागात पर्जन्यमान कमी झाले आहे. त्यामुळे पाण्याची भूगर्भातील पातळी अंत्यत खालावली आहे. आगामी काळात जलसंधारणाच्या कामाला तसेच भागातील ओढे, नद्या वाहत्या
जिवंत करण्याच्या कामाला प्राधान्य न दिल्यास मोठ्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे. नदी पात्रातील वाळू म्हणजे पाणी साठवणारी गुहा आहे. त्यामुळे नद्यांचे, ओढ्यांचे पुनरुज्जीवन करताना त्या पात्रात खडकापर्यंत न जाता खोलीकरण व रुंदीकरण केले पाहिजे, तरच पाणी मुरण्यास संधी मिळेल. सध्या महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी अशा प्रकारची नद्या पुनरुज्जीवन करण्याची कामे सुरू आहेत. यासाठी १०० कोटींचा विशेष निधी राखून ठेवला आहे.’डॉ. जाधव म्हणाले, ‘महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने येरळा नदीच्या पुनरुज्जीवनाचे मोठे काम श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून सुरू केले आहे. गावाच्या शिवारात सुमारे पाच किलोमीटर परिसरात येरळा नदीचे व नदीला येऊन मिळणाऱ्या ओढ्यांचे खोलीकरण व रुंदीकरण पूर्ण झाले आहे.’ यात्राकाळात सहकार्य करणाऱ्या विविध विभागांतील अधिकारी व कर्मचारी यांचा देवस्थान ट्रस्टच्या वतीने सत्कार करण्यात आला. तेसच बक्षीसप्राप्त जातिवंत जनावरांच्या मालकांना देवस्थानच्या वतीने प्रशस्तिपत्र व रोख बक्षीस देऊन गौरविण्यात आले. मोहन गुरव यांनी सूत्रसंचलन केले. (प्रतिनिधी)


नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा : मुदगल
जिल्हाधिकारी म्हणाले, ‘यात्रेशी संबंधित प्रत्येक विभागाने आपापल्या जबाबदाऱ्या व्यवस्थित सांभाळल्याने यात्रा शांततेत पार पडली. देवस्थान ट्रस्टने जलसंधारणाच्या कामाबाबत घेतलेली सकारात्मक भूमिका निश्चितच कौतुकास्पद आहे. येरळा नदी पुनरुज्जीवन विषय सोपा नाही. मात्र, नदीकाठच्या गावातील लोकांनी येरळा नदी पुनरुज्जीवन कार्यक्रमात सक्रिय सहभाग दाखवल्यास दुष्काळी भाग सुजलाम्-सुफलाम् होईल. शासन तुमच्या पाठीशी आहे; पण तुम्ही समाजासाठी सकारात्मक भूमिका घेणे गरजेचे असल्याचे नमूद करून हा प्रकल्प करत असताना नदी, ओढ्याकाठला अतिक्रमण होणार नाही, याची काळजी घेण्याची सूचना त्यांनी केली.

Web Title: ..when the Yerlah will have to flutter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.