सांस्कृतिक सातारा गेला तरी कुठे?
By Admin | Published: January 28, 2015 09:02 PM2015-01-28T21:02:13+5:302015-01-29T00:15:34+5:30
समर्थ करंडक : रसिकांच्या निरुत्साहाचे, महाविद्यालयीन रंगभूमीविषयीच्या उदासीनतेचे संयोजकांच्या धडपडीवर विरजण
सातारा : सांस्कृतिक चळवळीचा सुवर्णकाळ पाहिलेल्या साताऱ्याला समर्थ करंडक एकांकिका स्पर्धेच्या निमित्ताने रिकामे प्रेक्षागृह आणि महाविद्यालयीय रंगभूमीविषयीची अनास्था पाहावी लागली. स्थानिक नाट्यसंस्कृती जोपासण्याच्या मोजक्या प्रयत्नांपैकी एक असलेल्या या स्पर्धेच्या संयोजनासाठी असंख्य मदतीचे हात आजही न बोलावता पुढे येतात; मात्र अत्यल्प रसिकाश्रय पाहून सांस्कृतिक सातारा गेला तरी कुठे, असा प्रश्न पडत आहे.तब्बल बारा वर्षे सुरू असलेली ही स्पर्धा पाहण्यासाठी काही महाविद्यालयीन मुले यावर्षी मुंबईहून आली होती. तीन दिवस लॉजमध्ये राहून त्यांनी स्पर्धेचा आस्वाद घेतला. मुंबईला स्थायिक झालेल्या महाडच्या एका दाम्पत्यानेही शेवटच्या दिवशी आवर्जून हजेरी लावली. काही वर्षांपूर्वी हे दाम्पत्य स्पर्धक म्हणून येत असे. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून काम करणाऱ्या तज्ज्ञांनी मानधनाचीही अपेक्षा न करता चोख भूमिका बजावली. एका स्पर्धकाने तर चित्रपटाचे चित्रीकरण रद्द करून स्पर्धेला हजेरी लावली. मात्र, स्थानिक नाट्यप्रेमींनी स्पर्धेकडे पाठ फिरविल्याने सादरीकरणासाठी पोषक वातावरण निर्माण होऊ शकले नाही.अवघ्या काही वर्षांपूर्वीच एकांकिका पाहायला शाहू कलामंदिर ‘हाउसफुल’ होत असे. ‘चटाटो,’ ‘तीन शब्दांचा तमाशा’सारख्या विनोदी एकांकिकेचे असंख्य प्रयोग सातारकरांनी गर्दी करून बघितले, तसेच ‘शिपान,’ ‘भाकवान,’ ‘गजर’सारख्या सातारच्या रंगभूमीला वेगळे वळण देणाऱ्या एकांकिकाही उदंड रसिकाश्रयामुळेच राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचल्या. ‘शिपान’ आणि ‘उजेडफुला’ या एकांकिकांनी राष्ट्रीय पातळीवर झेंडे फडकविले. पुण्याच्या ‘पुरुषोत्तम करंडक’ स्पर्धेचा गौरव सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने नुकताच झाला. तथापि, पुणे विद्यापीठापुरत्या मर्यादित असलेल्या या स्पर्धेच्या रौप्य महोत्सवानिमित्त जेव्हा राज्यभरातून स्पर्धक आले, तेव्हा साताऱ्याने विशेष सांघिक पारितोषिक पटकावले होते. तेच कौशल्य रंगकर्मींमध्ये आजही आहे; मात्र विविध पातळ्यांवरून त्यांना प्रोत्साहन मिळत नाही, असा अनुभव आहे. (प्रतिनिधी)
यामुळे वाढतो उत्साह
‘समर्थ’ एकांकिका स्पर्धा घोषित होताच सुमारे वीस रंगकर्मी कामाला लागले. ओझी वाहण्यापासून स्पर्धक संघांना हवे-नको पाहण्यापर्यंत त्यांनी काम केले. एखाद्या स्पर्धकाला डोकेदुखी झाली तर ‘क्रोसीन’ आणून देण्यापर्यंत त्यांना जपले. स्पर्धेची घोषणा होताच अनेकांनी न मागता पैसे दिले. कधीच रंगभूमीवर न आलेल्या माणसांपासून रंगभूमी आणि चित्रपटात करिअर केलेल्यांपर्यंत अनेकांनी आर्थिक बाजूची उभारणी केली. चित्रपटसृष्टीत धडपड करून स्वत:चे स्थान निर्माण केलेले सातारचे रंगकर्मी ‘आपली स्पर्धा’ म्हणून आजही शक्य असेल ते करतात. त्यामुळेच प्रवेश शुल्काव्यतिरिक्त कोणताही खर्च स्पर्धकांना करावा लागत नाही. प्रकाशयोजनेच्या साहित्याचे भाडे आकारले जात नाही. प्रेक्षकांचा पूर्वीसारखा प्रतिसाद आज ना उद्या मिळेलच, या दुर्दम्य आत्मविश्वासावर रंगकर्मी कार्यकर्ते धडपड करीत आहेत.
यामुळे गळते अवसान
‘समर्थ’ एकांकिका स्पर्धा आयोजित करणाऱ्या मराठी नाट्य परिषदेच्या सातारा शाखेने गेल्या वर्षी सर्व महाविद्यालयांत जाऊन पत्र दिले होते. रंगभूमीची तांत्रिक अंगे समजावून घेण्यासाठी तरुण रंगकर्मींना ही एक संधी असून, आपण आपल्या विद्यार्थ्यांना स्पर्धेला पाठवावे, असे पत्रात म्हटले होते. मात्र, एकाही महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना पाठविले नाही. महाविद्यालयाच्या नावाने प्रवेशिकाही येत नाहीत. खरे तर युवक महोत्सवाच्या निमित्ताने तयार झालेल्या एकांकिकांचे खुल्या स्पर्धांमधून प्रयोग करणे फारसे खर्चिक नाही. मात्र, महाविद्यालये संघही पाठवत नाहीत, हाच अनुभव यावर्षीही आला. एके काळी महाविद्यालये अभिनय प्रशिक्षण शिबिरे आयोजित करीत होती. त्यातून अनेक रंगकर्मी घडलेही. मुंबईला जाऊन नाव कमावणाऱ्या काही रंगकर्मींचा महाविद्यालये सत्कारही करतात; मात्र नव्याने रंगकर्मी घडविण्यासाठी प्रयत्न होत नाहीत.