मनोमिलनाचं घोडे कुठे अडले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:27 AM2021-06-18T04:27:41+5:302021-06-18T04:27:41+5:30
अवघ्या पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक २९ जून रोजी होत आहे. सध्या कारखान्याची सत्ता ...
अवघ्या पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक २९ जून रोजी होत आहे. सध्या कारखान्याची सत्ता भाजपवासी असलेल्या डॉ. सुरेश भोसले व डॉ. अतुल भोसले यांच्या सहकार पॅनलकडे आहे. त्यामुळे त्यांना रोखण्यासाठी त्यांचेच पारंपरिक विरोधक असलेल्या डॉ. इंद्रजित मोहिते व अविनाश मोहिते यांच्या मनोमिलनाचे प्रयत्न युद्धपातळीवर झाले.
कृष्णा कारखान्याचे माजी अध्यक्ष डॉ. इंद्रजित मोहिते हे काँग्रेस विचाराचे पाईक आहेत, तर दुसरे माजी अध्यक्ष अविनाश मोहिते हे राष्ट्रवादीचे पदाधिकारी आहेत. राज्यात महाविकास आघाडीचा गाडा हाकला जात आहे. त्यामुळे तोच पॅटर्न कारखाना निवडणुकीत राबविण्याच्या इराद्याने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम, ॲड. उदयसिंह पाटील यांनी पुढाकार घेतला. चार महिन्यांत अनेक बैठका झाल्या. त्यात बऱ्याच चर्चा झाल्या. लवकरच ‘गुड न्यूज’ मिळेल, असेही कार्यकर्ते खात्रीशीर सांगत होते; पण अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी या चर्चांमधून रस बाहेर पडला नाही, हे स्पष्ट झाले आहे.
काही दिवसांपूर्वीच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेतच मी कृष्णाच्या निवडणूक पार्श्वभूमीवर डॉ. इंद्रजित मोहिते व अविनाश मोहिते यांच्या मनोमिलनासाठी खूप प्रयत्न केले; पण त्याला यश आले नाही. त्यामुळे मी या चर्चेतून बाहेर पडत असल्याचे जाहीर केले. तेव्हा, राज्यात तीन पक्षांचे सरकार तुम्ही आणू शकता, मग इथे दोघांना एकत्र आणायला काय अडचण आली. नेमके घोडे कुठे अडतेय, असे विचारले. मात्र, त्यावर पृथ्वीराज चव्हाणांनी बोलणे टाळले. त्यामुळे मनोमिलन प्रक्रिया थांबली, असा संदेश सर्वत्र गेला.
त्यानंतर काही दिवसांनी पृथ्वीराज चव्हाण व शरद पवार यांची मुंबईत भेट झाली. या भेटीत कृष्णावरही चर्चा झाली. त्यामुळे मोहितेंच्या मनोमिलनाच्या चर्चेला पुन्हा एकदा सुरुवात झाली; पण जपून शब्द टाकणाऱ्या थोरल्या पवारांनी इथे शब्द खर्च केला का? हा संशोधनाचा भाग आहे. त्यामुळे गुरुवारी अर्ज माघारीच्या अंतिम दिवशी तिरंगी लढत स्पष्ट झाली.
गुरुवारी रयत पॅनलच्या वतीने एक पत्रकार परिषद झाली. त्यात मंत्री विश्वजित कदम यांनाही माध्यमांच्या प्रतिनिधींनी मनोमिलन प्रक्रियेत नेमकी काय अडचण आली? नेमका काय प्रस्ताव होता? याबाबत विचारले. त्यावेळी मनोमिलन होऊ शकले नाही. आम्ही प्रामाणिक प्रयत्न केला. एवढेच त्यांनी सांगितले; पण प्रस्ताव काय होता? यावर बोलणे खुबीने टाळले, तर इंद्रजित मोहिते यांनी या प्रश्नाकडे सोईस्कर दुर्लक्ष केले. त्यामुळे मनोमिलन नेमके का होऊ शकले नाही, याबाबत सभासद कार्यकर्त्यांची उत्सुकता कायम आहे. आता अविनाश मोहिते या प्रश्नांची काय उत्तरे देणार, हे पाहावे लागेल.
दरम्यान, कार्यकर्त्यांत मात्र याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे. कोणी म्हणे पहिला अध्यक्ष कोणी व्हायचे यावरून एकमत झाले नाही, तर काही जण म्हणतात, जागावाटपावरून दोघांचे जमले नाही; पण या चर्चा म्हणजे ‘वाऱ्यावरची वरात’ आहे. नेमके मनोमिलन का झाले नाही, हे दोन माजी अध्यक्ष माहितेंना व त्यासाठी प्रमुख मध्यस्थी करणाऱ्यांनाच माहीत. ते यावर काहीच बोलायला तयार नाहीत; पण मनोमिलनाचे घोडे नेमके कुठे अडले याबाबतच्या चर्चा निवडणूक होईतोपर्यंत उलटसुलट अन् चवीने चघळल्या जाणार, हे मात्र निश्चित!
-प्रमोद सुकरे, कराड