मोफत आहाराचा निधी जातोय तरी कुठे? पंतप्रधान सुरक्षित मातृत्व योजना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 10:36 PM2019-05-30T22:36:16+5:302019-05-30T22:41:42+5:30
रहिमतपूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील पंतप्रधान सुरक्षित मातृत्व योजनेंतर्गत मिळणारा सरकारी निधी व प्रसूती मोफत आहाराच्या शासकीय अनुदानाचा योग्य वापर होत नसल्याच्या तक्रारी वाढत असल्याने निधी जातोय कुठे की
शशिकांत क्षीरसागर ।
धामणेर : रहिमतपूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील पंतप्रधान सुरक्षित मातृत्व योजनेंतर्गत मिळणारा सरकारी निधी व प्रसूती मोफत आहाराच्या शासकीय अनुदानाचा योग्य वापर होत नसल्याच्या तक्रारी वाढत असल्याने निधी जातोय कुठे की कागदोपत्री दाखवला जातोय, असे अनेक प्रश्न रुग्णांना पडत असून, तशी चर्चा परिसरात सुरू आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्राची स्थापना १९९० मध्ये झाली असून, नगरपरिषद कार्यक्षेत्रात जिल्हा परिषदचे आरोग्य केंद्र असल्यामुळे दोन्ही पदाधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे. मात्र यात रुग्णांचे हाल होत आहेत. परिसरातील सुमारे तीस गावांचा समावेश आहे. या केंद्रात महिन्याला सरसरी दहा ते बारा प्रसूती होत असतात. त्यावेळी पंतप्रधान सुरक्षित मातृत्व योजनेचा लाभ पाच हजार रुपये देण्यासाठी शासकीय नियमानुसार कागदपत्रे घेतली जातात.
महिलांना तुमच्या बँक खात्यावर पैसे जमा होतील, असे सांगितले जाते; परंतु एक वर्ष उलटले तरी पैसे जमा झाले नाहीत, महिलांना बँक कर्मचारी केंद्रात व केंद्रातील बँकेत हेलपाटे मारायला लावत आहेत. त्यामुळे काहींनी तर पैसाचा विचारच सोडून दिला आहे, हे समोर आले आहे. तसेच प्रसूतीग्रस्त महिलांसाठी प्रती महिलेस प्रसूती आहार योजनेतून शासनाकडून ७० रुपये येतात; परंतु सर्वांना त्याचा लाभ दिला जात नाही. मात्र कागदोपत्रीत दाखवले जातात, त्यामुळे महिलाचे जेवणाचे हाल होत आहेत.
इंजेक्शनसाठी दहा ते वीस रुपये व सलाईनसाठी शंभर रुपये घेतले जातात, असे समजते. अशी चर्चाही उघडपणे रुग्णांमध्ये चालू असते; मात्र तक्रार करायला कोणी पुढे येत नाही. फलक मात्र मोफत लावलेले दिसतात. प्रत्यक्षात मात्र परिस्थिती वेगळी आहे. रात्री डॉक्टर नसतात, त्यामुळे रुग्ण गाडी करून इतर दवाखान्यात पाठवावे लागतात, अशा असंख्य समस्यांच्या विळख्यात आरोग्य केंद्र आहे. रुग्ण कल्याण समितीनेही याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.