कराडच्या तालुका क्रीडा अधिकाऱ्यांना नेमकं शोधायचं तरी कुठं?, क्रीडा संकुल असून अडचण नसून खोळंबा
By प्रमोद सुकरे | Published: May 10, 2023 07:07 PM2023-05-10T19:07:12+5:302023-05-10T19:07:45+5:30
प्रमोद सुकरे कराड: ग्रामीण भागातील विद्यार्थी, मुले खेळामध्ये तरबेज व्हावीत. त्यांना त्यासाठी आवश्यक असणारे मार्गदर्शन आणि साधने उपलब्ध व्हावीत ...
प्रमोद सुकरे
कराड: ग्रामीण भागातील विद्यार्थी, मुले खेळामध्ये तरबेज व्हावीत. त्यांना त्यासाठी आवश्यक असणारे मार्गदर्शन आणि साधने उपलब्ध व्हावीत यासाठी क्रीडा संकुल आणि त्याचबरोबर तालुकास्तरीय स्पर्धांचे नियोजन करणे, खेळाडूंच्या सवलतीबाबत पत्रव्यवहार करणे आदी कारणांसाठी तालुक्याला क्रीडा अधिकारी अशी व्यवस्था करण्यात आली आहे. पण कराड तालुक्याच्या क्रीडा अधिकार्यांना नेमके शोधायचे कुठे? असा प्रश्न खेळाडूंना आणि क्रीडाप्रेमींना पडतोय.
कराड तालुक्याला क्रीडा अधिकारी म्हणून संगिता जगताप यांची नियुक्ती आहे. पण त्या कराडला कितिदा आल्या हे समजायला मार्ग नाही. मग त्यांनी येथे येवून काम काय केले हा भाग निराळाच.
खरंतर तालुका क्रिडा अधिकार्यांचे कार्यालय हे क्रीडा संकुलात असले पाहिजे. पण ते बंद आहे. क्रीडा संकुलनाचा वापरच नाही. त्यामुळे तालुका क्रिडा अधिकार्यांना मग शोधायचं कुठे? हा प्रश्न पडणारच.
याबाबत अधिक माहिती घेतली असता सातारा जिल्ह्याला तालुका क्रीडा अधिकार्यांची ३ पदे मंजूर आहेत. पण प्रत्यक्षात २ पदे भरलेली आहेत. अन ११ तालुक्यातील कारभार हाकायचा आहे. त्यामुळे हे तालुका क्रिडा अधिकारी सगळीकडे पुरु शकत नाहीत.पण त्या कारणाखाली तालुका क्रिडा अधिकारी वर्ष वर्षभर इतर तालुक्याला फिरकत नाहीत ही मात्र शोकांतिकाच म्हणावी लागेल.
जिल्ह्यात सर्वात जास्त मोठा तालुका म्हणून कराड तालुक्याची ओळख आहे. ऑलम्पिक वीर खाशाबा जाधव यांच्यासारख्या अनेकांचा क्रीडा क्षेत्रातील मोठा वारसा कराडला आहे. त्यामुळे जिल्हा क्रीडा अधिकार्यांनी कराडचा विचार करताना जरा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. शिवाय येथे तालुका क्रीडा संकुल इमारत चांगल्या पद्धतीने उभी आहे .त्याचा वापर कसा करून घेता येईल याकडे लक्ष दिले पाहिजे.
जिल्हा क्रीडा अधिकारी उवाच
याबाबत सातारा जिल्ह्याचे क्रीडा अधिकारी युवराज नाईक यांच्याशी संपर्क साधला असता कराडचे तालुका क्रीडा संकुल तयारच आहे. तेथे लाईट, पाणी सोय करण्यात आली आहे. व्यायामाचे साहित्य आठवड्याभरात पोहोच होणार आहे. एक कोच नेमण्यात आला आहे. आता लोकांनी त्याचा वापर करायला हवा असे ते सांगतात. पण तेथील वॉचमन, शिपाई, क्लार्क यांची कामे नेमकी कोण करणार? हे मात्र ते सांगत नाहीत.
दरम्यान कराडच्या तालुका क्रीडा अधिकारी संगीता जगताप यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी फोन न उचलल्याने त्या कराडला आल्या आहेत किंवा नाही हे समजू शकले नाही.
संगीता जगताप यांच्याकडे कराडच्या तालुका क्रीडा अधिकार पदाची जबाबदारी आहे. आठवड्यातून तीन दिवस सोमवार ,मंगळवार, बुधवार या दिवशी त्यांनी कराड या तालुक्याच्या ठिकाणी उपस्थित राहिले पाहिजे असे त्यांना लेखी पत्र दिले आहे. त्याची अंमलबजावणी होईल. - युवराज नाईक जिल्हा क्रीडा अधिकारी, सातारा