जिथं गावानं नेत्याला... मग नेत्यानं गावाला उभं केलं!

By Admin | Published: January 13, 2016 10:10 PM2016-01-13T22:10:03+5:302016-01-13T22:10:03+5:30

डोंगराळ भागात नेतृत्वबीजे : विकासाचे वारे वाहू लागल्याने शेतकरीही वळला नगदी पिकांकडे; हळद, आले, स्ट्रॉबेरीच्या बागा डोलू लागल्या

Where the village leader leader ... Then the leader raised the village! | जिथं गावानं नेत्याला... मग नेत्यानं गावाला उभं केलं!

जिथं गावानं नेत्याला... मग नेत्यानं गावाला उभं केलं!

googlenewsNext

निलेश भोसलेल्ल सायगाव
काही गावांच्या मातीतच नेतृत्वाची बीजं दडलेली असतात. अशी गावं मग त्यांची पारंपरिक ओळख बाजूला ठेवून नेत्यांची गावं म्हणून ओळखली जातात. गावातून नेतृत्व उभं राहतं आणि तेच नेतृत्व मग गावाला उभं करतं, हुमगाव गाव याला अपवाद नाही. आपला बुलंद आवाज आणि कणखर नेतृत्वानं सातारच्या राजकीय पटलावर अल्पावधीत आपली पकड ज्यांनी मजबूत केली ते कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आणि जावळीचे भूमिपुत्र शशिकांत शिंदे यांचे हे जन्मगाव. दोन दशकांपूर्वी हे गाव दुर्लक्षितच होतं; पण हेच गाव आता विकासाचा आयकॉन ठरू पाहत आहे.
या गावाला हुमगाव नाव कसं पडलं. याबद्दल ग्रामस्थांनी दिलेली माहिती रोमहर्षक आहे. कधीकाळी राक्षसांचा उपद्रव कमी करण्यासाठी ऋषीमुनी होमहवन करीत. या होमातून अवतीर्ण झाली ‘होमजाई’ पुढे त्याचा हुमजाई असा अपभ्रंश झाला. हुमजाई या ग्रामदैवतापासून गावाला ‘हुमगाव’ नाव मिळाले. देवीच्या नावावरून गावाचे नाव प्राप्त करणारी फार कमी गावे आहेत.
हुमगाव हे त्यापैकी एक. अंदाजे दोन हजार लोकसंख्येच्या या गावात सर्व जाती धर्माचे लोक आहेत. गावची रचना वैशिष्ट्यपूर्ण आहे. गावच्या मध्यभागी एक अवाढव्य चौक आहे. जेथे सर्व रस्ते येऊन मिळतात. गावालगतच कुडाळी नदी वळसा घेऊन जाते. गावातील लोकांचा प्रमुख व्यवसाय शेती आहे. अनेकजण माथाडीमध्येही काम करून उपजीविका भागवतात. गावातील सिंचन सुविधांमुळे पारंपरिक पिके बाजूला पडून ऊस, हळद, आले, स्ट्रॉबेरी अशा नगदी पिकांकडे लोकांचा ओढा वाढला आहे. कुडाळी नदीवर शशिकांत शिंदे व शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रयत्नातून केटीवेअर होऊ घातल्यामुळे बरीचशी जिरायत शेती ओलिताखाली येणार आहे.
गावात गट-तट जातीपाती नसल्याने आजवर सर्व निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. परिणामी गावात विकासाची घोडदौड सुरू आहे. भौतिक सोयीसुविधांनी गावचा चेहरामोहरा बदलला आहे. निर्मल ग्राम, तंटामुक्ती, पर्यावरण सुंतलित समृद्ध ग्राममधून बक्षिसे मिळालेल्या या गावाने ग्रामस्वच्छतेचा ध्यास घेतला आहे.
मेढा येथील आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयाने हुमगावला ‘स्मार्ट व्हिलेज’ अंतर्गत पाच वर्षांसाठी दत्तक घेतले आहे. गावचे जीपीएस सर्वेक्षण नुकतेच पूर्ण करण्यात आले. महाविद्यालयामार्फत २५ शोषखड्ड्यांची निर्मिती केली असून, १०० शोषखड्ड्यांचा संकल्प केला आहे. गावाशेजारील दलित वस्त्यांमधून स्वच्छतेला प्राधान्य देण्यात येऊन शाहू, फुले, आंबेडकर अभियानात गावाने सक्रिय सहभाग नोंदविला आहे.
आमदार शशिकांत शिंदे यांच्या विचारांचा वसा आणि वारसासोबत शिवेंद्रसिंहराजे भोसलेंच्या मार्गदर्शनाखाली गावकारभारी गावगाडा हाकत आहेत. हृषीकांत शिंदे, विद्यमान पंचायत समिती सदस्य मोहन शिंदे, दादासाहेब शिंदे, दत्तात्रय घाडगे, बुवासाहेब पिसाळ या सर्वांच्या मार्गदर्शनातून हुमगाव विकासाचे रोल मॉडेल ठरू पाहतेय, याबाबत सध्या तरी दुमत नाही.

पाच वर्षाचे विजन आणि विकासाचा सुस्पष्ट आराखडा आमच्या डोळ्यांसमोर आहे. स्वच्छ आणि पारदर्शक कारभाराला प्राथमिकता देणे आणि सहभागातून समृद्धी मिळविणे, हे आमचे ध्येय आहे. या नेत्यांच्या गावाचा लौकिक कायम ठेवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
- भाऊसाहेब जंगम, सरपंच हुमगाव
गावाच्या विकासातील निर्णप्रक्रियेत सर्व आजी-माजी पदाधिकाऱ्यांचे आणि सर्व नेते मंडळींची सहकार्य असल्याने विकासकामे करताना कोणतीही अडथळा जाणवत नाही. त्यामुळे सर्व गावकारभाऱ्यांचा उत्साह दुणावला आहे.
-अर्चना प्रमोद शिंदे

Web Title: Where the village leader leader ... Then the leader raised the village!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.