भोंगे लावायचे की ठेवायचे, या मुद्द्यापेक्षा झाडे लावलेले परवडणारे - रामराजे नाईक-निंबाळकर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2022 02:09 PM2022-06-06T14:09:52+5:302022-06-06T14:10:27+5:30
शौचालय असेल, तर निवडणूक लढण्याचा कायदा आला. त्यानंतर, दोन अपत्य असतील, तर निवडणूक लढविण्याचा कायदा आला. आता घरापुढे झाडे असतील, तर निवडणुका लढवण्याचा कायदा आला पाहिजे.
फलटण : भोंगे लावायचे की ठेवायचे, या मुद्द्यापेक्षा झाडे लावलेले परवडणारे आहे. आज सर्व देशांपुढे जागतिक तापमान वाढीचे जे संकट ओढावले आहे, त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. झाडे लावून त्याचा समतोल टिकविणे गरजेचे असून, वृक्षचळवळीचा वेगळा फलटण पॅटर्न करून दाखविणार असल्याची घोषणा विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी केली.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त श्री नाईक निंबाळकर देवस्थाने व इतर चॅरिटीज ट्रस्ट, फलटण यांच्या वतीने इरिगेशन कॉलनी परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार दीपक चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, तहसीलदार समीर यादव, उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बर्डे, उपवनसंरक्षक महादेव मोहिते प्रा.सुधीर इंगळे, वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
रामराजे म्हणाले, शासनाने वनविभागाला वृक्षारोपणाचे उद्दिष्ट दिले असले, तरी हे उद्दिष्ट आपण सातारा जिल्ह्यात सर्वांनी एकत्र येऊन साध्य केले पाहिजे. फलटणमध्ये हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आमच्या संस्था व इतरांना बरोबर घेऊन वृक्षारोपणाची वेगळी चळवळ उभी करून फलटण पॅटर्न उभारणार आहोत. ज्या पद्धतीने मागील काळात पाणी चळवळ राबविली गेली, त्या पद्धतीने आमीर खानला वृक्षारोपण चळवळीबाबत पुढे करणार असून, फिल्मी कलाकारांचे ग्लॅमर प्राप्त करणे, या चळवळीसाठी गरजेचे बनल्याचे रामराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितले.
शौचालय असेल, तर निवडणूक लढण्याचा कायदा आला. त्यानंतर, दोन अपत्य असतील, तर निवडणूक लढविण्याचा कायदा आला. आता घरापुढे झाडे असतील, तर निवडणुका लढवण्याचा कायदा आला पाहिजे. झाडे लावली, तर तिकिटे दिली पाहिजेत. आता तर भोंगे लावायचे की ठेवायचे, यापेक्षा झाडे लावणे परवडणार असून, राजकारण राजकारणाच्या पातळीवर ठेवून सर्वांनी वृक्षलागवडीच्या चळवळीकडे लक्ष देऊन पर्यावरणाचा समतोल राखावा, असे आवाहन यावेळी रामराजे यांनी केले.