Satara News: स्वत:च्या शेतात गवत पेटविले, आग लागली दुसऱ्याच्या उसाला; दोघांवर गुन्हा नोंद
By नितीन काळेल | Published: March 3, 2023 02:17 PM2023-03-03T14:17:20+5:302023-03-03T14:17:50+5:30
शेतकऱ्याचे मोठे नुकसान
सातारा : शेतातील गवत पेटविताना आवश्यक ती उपाययोजना न केल्याने शेजारील शेतकऱ्याच्या उसाला आग लागली. तसेच शेती साहित्याचेही नुकसान झाले. ही घटना माण तालुक्यातील वडगाव येथे घडली. याप्रकरणी दहिवडी पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा नोंद झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, याप्रकरणी विजयकुमार दगडू ओंबासे (रा. वडगाव) या शेतकऱ्याने पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार रघुनाथ गणपत बोराटे, विशाल रघुनाथ बोराटे (दोघेही रा. बिदाल, ता. माण) यांच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे. दि. १ मार्च रोजी सकाळच्या सुमारास वडगाव येथील खोरीचा तलाव नावाच्या शिवारात हा प्रकार घडला आहे. संशयितांनी स्वत:च्या शेतातील गवत पेटविले होते; पण आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली नव्हती.
त्यामुळे गवताला लागलेली आग तक्रारदाराच्या उसात गेली. तक्रारदाराचा एक वर्ष झालेला ३० गुंठे क्षेत्रात ऊस होता. तसेच ठिबक सिंचनची पाइप, केबल तसेच इतर शेती उपयोगी साहित्य आगीत सापडले. आग लागल्याने आंब्याचे झाडही होरपळले. त्याचबरोबर आग पसरत गेल्यामुळे बाजूच्या शेतकऱ्यांच्या पिकाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याप्रकरणी दहिवडी पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा नोंद झाला आहे. हवालदार बी. एस. खांडेकर हे अधिक माहिती घेत आहेत.