देवदर्शनाला जाताना कार पुलाच्या कठड्याला धडकून आजोबा, नातवाचा मृत्यू
By दत्ता यादव | Published: February 1, 2024 10:56 PM2024-02-01T22:56:28+5:302024-02-01T22:56:43+5:30
हा अपघात गुरुवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास हमदाबाज फाटा, ता. सातारा येथे झाला.
सातारा : पाल, ता. कऱ्हाड येथे देवदर्शनासाठी जाताना चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार पुलाच्या कठड्याला धडकून आजोबा आणि तीन महिन्यांच्या नातवाचा दर्दैवी मृत्यू झाला. हा अपघात गुरुवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास हमदाबाज फाटा, ता. सातारा येथे झाला.
नामदेव पांडुरंग जुनघरे (वय ५८, रा. सावली, ता. जावळी), आद्विक अमर चिकणे (वय तीन महिने, रा. लांजे, जावळी) असे अपघातात मृत्यू झालेल्या आजोबा आणि नातवाचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जुनघरे कुटुंबीय कारने पाल, ता. कऱ्हाड येथे देव दर्शनाला निघाले होते. सातारा शहराजवळील हमदाबाज फाट्यावर आल्यानंतर एका वळणावर चालक प्रसाद जुनघरे (वय २५) याचे कारवरील नियंत्रण सुटले. कारचा वेग प्रचंड असल्यामुळे पुलाच्या कठड्याला कार जोरदार धडकली. यात आजोबा व नातवाचा मृत्यू झाला. तर, अन्य चार जण जखमी झाले. जखमींना काही नागरिकांनी तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या अपघाताची माहिती सातारा तालुका पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांना मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमींना त्यांनी रुग्णालयात दाखल केले. तसेच अपघातग्रस्त कार रस्त्याच्या बाजूला केली. त्यामुळे वाहतूक पूर्ववत झाली.
सातारा तालुका पोलिस ठाण्यात या अपघाताची नोंद झाली असून, हवालदार विशाल मोरे हे अधिक तपास करीत आहेत.