महाराष्ट्रपुत्राला वीरमरण, जम्मू काश्मीरमध्ये कर्तव्य बजावताना जवान शहीद
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2020 05:16 PM2020-01-10T17:16:11+5:302020-01-10T17:38:36+5:30
जवान संदीप रघुनाथ सावंत जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात शहीद झाले होते.
सातारा - जम्मू आणि काश्मीरमध्ये देशसेवेचं कर्तव्य बजावत असताना साताऱ्यातील जवान ज्ञानेश्वर जाधव यांना वीरमरण प्राप्त झाले आहे. ज्ञानेश्वर हे खटाव तालुक्यातील धकटवाडी या मूळ गावचे रहिवासी आहेत. त्यांच्या निधनाची बातमी कळताच, गावासह तालुक्यात शोककळा पसरली आहे. सन 2015 मध्ये ते बीएसएफमध्ये भरती झाले होते. साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांनीही आपल्या ट्विटरवरुन ज्ञानेश्वर यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
सातारा जिल्ह्याच्या कराड तालुक्यातील जवान संदीप रघुनाथ सावंत जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात शहीद झाले होते. गेल्याच आठवड्यात शुक्रवारी सकाळी कऱ्हाडमध्ये त्यांचे पार्थिव आणण्यात आले. त्यानंतर, शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी, सैन्य दलातील अधिकारी, लोकप्रतिनिधी तसेच हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते. या घटनेच्या 8 दिवसांतच साताऱ्यातील आणखी एका जवानाने देशासाठी आपलं बलिदान दिलंय. उद्या त्यांचे पार्थिव मूळ गावी येणार असल्याचे समजते.
सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील धकटवाडी गावचे सुपुत्र BSF जवान ज्ञानेश्वर चंद्रकांत जाधव यांना जम्मू आणि काश्मिर मध्ये ड्युटी बजावत असताना वीर मरण आले.
— Chhatrapati Udayanraje Bhonsle (@Chh_Udayanraje) January 10, 2020
भावपूर्ण श्रद्धांजली... pic.twitter.com/gPOynupamq
शहीद ज्ञानेश्वर जाधव हे सन 2015 मध्ये बीएसएफमध्ये भरती झाले होते. खटाव येथून बारावीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर ते सैन्य दलात भरती झाले. गेल्या 5 वर्षांपासून ते देशसेवा करत. दोन वर्षांपूर्वीच त्यांचे लग्न झाले होते, त्यांना सहा महिन्यांचा मुलगाही आहे. वडूज पोलीस ठाण्यातून अधिकृतपणे त्यांच्या निधनाची माहिती देण्यात आली आहे. या घटनेनं जाधव कुटुंबासह गावात शोककळा पसरली आहे. तसेच, भाजपा नेते माजी खासदार उदयनराजेंनीही ट्विटर व फेसबुकवरुन त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.