विस्कटलेली काँग्रेस एकवटताना दिसतेय!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:26 AM2021-07-11T04:26:31+5:302021-07-11T04:26:31+5:30
कऱ्हाड : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना निवडणूक नुकतीच झाली. या तिरंगी निवडणुकीत डॉ. इंद्रजीत मोहिते व अविनाश ...
कऱ्हाड : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना निवडणूक नुकतीच झाली. या तिरंगी निवडणुकीत डॉ. इंद्रजीत मोहिते व अविनाश मोहिते यांच्या पॅनेलमध्ये कऱ्हाड तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्ते विभागलेले दिसले. याबाबत उलटसुलट चर्चाही झाल्या; पण प्रमिलाताई चव्हाण जयंतीनिमित्त मलकापुरात झालेल्या एका कार्यक्रमात हे कार्यकर्ते पुन्हा एकवटताना दिसले. ही बाब नक्कीच सकारात्मक मानली जात आहे.
कारखान्याच्या निवडणुकीत सत्ताधारी डॉ. सुरेश भोसले व डॉ. अतुल भोसले यांना रोखण्यासाठी त्यांच्या विरोधातील काँग्रेस विचाराचे डॉ. इंद्रजीत मोहिते व राष्ट्रवादीचे नेते अविनाश होते. यांनी एकत्रित येऊन निवडणूक लढवावी, अशी अनेकांची भावना होती. त्यासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम, रयत कारखान्याचे अध्यक्ष ॲड. उदयसिंह पाटील यांनी पुढाकार घेतला होता. मात्र त्याला यश आले नाही. त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांनी या प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कारखान्यात दोन माजी अध्यक्ष मोहित्यांची आघाडी होत नाही म्हटल्यावर या निवडणुकीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यानंतर काँग्रेसचे प्रमुख कार्यकर्ते दोन मोहितेच्या पॅनमध्ये विखुरले. डॉ. इंद्रजीत मोहिते यांच्या पॅनलच्या प्रचारात कऱ्हाड दक्षिण काँग्रेसचे अध्यक्ष मनोहर शिंदे, प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, जिल्हा कॉंग्रेसचे सरचिटणीस पैलवान नाना पाटील, नितीन थोरात, ॲड. नरेंद्र पाटील, अविनाश नलवडे, दीपक लिमकर, शंकर खबाले, बाळासाहेब गलांडे आदी कार्यकर्ते दिसले.
दुसरीकडे अविनाश मोहिते यांच्या पॅनेलला प्रचारात स्वतः काँग्रेसचे नेते ॲड. उदयसिंह पाटील, अजितराव पाटील, पंचायत समिती सदस्य नामदेव पाटील, जयवंतराव जगताप, शिवाजीराव मोहिते आदी प्रमुख कार्यकर्ते सक्रिय होते. महिनाभर चाललेल्या प्रचाराच्या रणधुमाळीत हे सगळे कार्यकर्ते आघाडीवर होते. प्रचार सभांमधून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या त्यातही हे होतेच. त्यामुळे पुढे काय होणार याबाबत चर्चा सुरू झाल्या होत्या. भविष्यात काँग्रेसचे प्रमुख कार्यकर्ते एकत्र कसे दिसणार याबाबत शंकाकुशंका निर्माण केल्या जात होत्या. पण गुरुवार, दि. ८ जुलै रोजी मलकापूर येथील दिवंगत प्रमिलाताई चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात यातील बहुतांशी कार्यकर्ते एकत्र दिसले.
मलकापूर नगरपालिकेने कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या बरोबरीने ॲड. उदयसिंह पाटील, अजितराव पाटील, मनोहर शिंदे आदी नेते मांडीला मांडी लावून बसलेले दिसले. त्यामुळे विस्कटलेली काँग्रेस पुन्हा एकत्र आल्याचे चित्र अनेकांना सुखद वाटले. पण यावेळी त्यांच्यात पहिल्यासारखा मोकळेपणा दिसला नाही. भविष्यात तो मोकळेपणा पाहायला मिळेल अशी आशा करायला हरकत नाही.
चौकट
ती काही पक्षीय निवडणूक नव्हती ...
कारखान्याची निवडणूक ही काही पक्षीय निवडणूक नव्हती. आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी आघाडीच्या चर्चेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. कार्यकर्त्यांना त्यांचे निर्णय स्वतः घेण्याची मोकळीक दिली. त्यामुळे कार्यकर्त्यांनी त्याला योग्य वाटले तसे निर्णय घेतले. असे एका काँग्रेस कार्यकर्त्याने सांगितले.