कुजबुज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:24 AM2021-07-03T04:24:20+5:302021-07-03T04:24:20+5:30
राजवाडा येथील भाजी मंडईचे एकेक गमतीदार किस्से समोर येतात. राजवाडा ते मंगळवार तळे या रस्त्यावर सध्या भाजी विक्रेते बसलेले ...
राजवाडा येथील भाजी मंडईचे एकेक गमतीदार किस्से समोर येतात. राजवाडा ते मंगळवार तळे या रस्त्यावर सध्या भाजी विक्रेते बसलेले असतात. मुख्य भाजी मंडई बंद असल्याने भाजी विक्रीला दुसरी जागा नसल्याने विक्रेत्यांसमोरही पर्याय नाही. मात्र, रस्त्यावर वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून वाहतूक शाखेचे पोलीस येऊन त्यांच्यावर कारवाई करतात. अनेकदा नगरपालिकेचे अतिक्रमण विभागाचे कर्मचारीदेखील येऊन त्यांना पाट्या उचलायला लावतात. दोन दिवसांपूर्वी मात्र वेगळाच गमतीदार किस्सा घडला. दुपारी चारनंतर दुकाने बंद करण्याचे आदेश आहेत तर पाच नंतर संचारबंदी लागू आहे. त्यामुळे पावणे पाचपासूनच सगळ्यांची धावाधाव सुरू होते. दुकानदार दुकाने बंद करतात तर भाजी विक्रेतेदेखील घाईगडबडीने भाजी विकून घरी परतण्याच्या बेतात असतात. या रस्त्यावरच काही सातारकर भाजी खरेदी करत थांबले होते, त्याच दरम्यान खाकी वर्दीतील एक पोलीस दादा घाईगडबडीत त्याठिकाणी आले. पोलिसांना पाहताच सगळ्यांची बोबडी वळली. आता पोलीस कारवाई करणार, असा अंदाज सर्वांना आला, त्यामुळे सर्वांचीच पळापळ झाली. भाजी विक्रेतेदेखील घेऊन पळण्याच्या बेतात असतानाच पोलिसांनी त्यांना थांबवून ठेवलं. अरे... थांबा मलाच भाजी घ्यायची आहे, असं ते म्हणाले आणि सगळ्यांचा जीव भांड्यात पडला. पोलीस दादांनादेखील कुटुंब आहे. ड्युटी संपल्यानंतर घरच्या सांगण्यावरून त्यांनादेखील भाजी घरी न्यावी लागते. हे सामान्यपणे लगेच लक्षात आले नसल्याने त्यांची घाबरगुंडी उडाली. पोलीस दादादेखील आपल्यासोबत भाजी खरेदी करतात हे पाहून सगळ्यांना हायसे वाटले.