‘शिट्टी’ वाजतेय, ‘नारळ’ फुटताहेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:27 AM2021-06-26T04:27:06+5:302021-06-26T04:27:06+5:30
यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक २९ जून रोजी होत आहे. सध्या याचा प्रचार जोरदार सुरू असून, तो ...
यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक २९ जून रोजी होत आहे. सध्या याचा प्रचार जोरदार सुरू असून, तो अंतिम टप्प्यात आलेला आहे. गावोगावच्या मंदिरांमध्ये ‘नारळ’ फुटलेले पाहायला मिळत आहेत. सभा कार्यक्रमातून ‘शिट्टी’ वाजल्याचा आवाज होताना दिसतोय, तर पाहुणचारासाठी ‘कपबशी’तून दिलेला चहा काहींना गोड, तर अनेकांना गरम लागताना दिसतोय.
सातारा : सांगली जिल्ह्यातील पाच तालुक्यात कार्यक्षेत्र असलेल्या कृष्णा कारखान्याची निवडणूक तिरंगी होत आहे. सत्ताधारी डॉ. सुरेश भोसले यांच्या सहकार पॅनलला ‘कपबशी’ चिन्ह मिळालेले आहे. अविनाश मोहिते यांच्या संस्थापक पॅनलला ‘नारळ’ हे चिन्ह मिळाले आहे, तर डॉ. इंद्रजित मोहिते यांच्या रयत पॅनलला ‘शिट्टी’ हे निवडणूक चिन्ह मिळालेले आहे. प्रचार गतिमान झाल्याने या चिन्हांच्या अनुषंगाने काही गमतीदार किस्से चर्चेत येत आहेत.
कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात श्रीफळ (नारळ) वाढवून करण्याची आपल्याकडे पद्धत आहे. त्यामुळे या तीनही पॅनलचे प्रचार शुभारंभ गावोगावच्या मंदिरात नारळ फोडून झाले आहेत, तर प्रचारासाठी आलेल्या व्यक्तींचे स्वागत नारळ देऊनच होत आहे. त्यामुळेच संस्थापक पॅनलचे कार्यकर्ते नारळाशिवाय ‘सत ना गत’ अशी टिप्पणी करताना दिसतात. रयत व सहकार पॅनलच्या उमेदवारांना एकाद्या मतदाराच्या घरी गेल्यावर स्वागतासाठी म्हणून नारळ दिला गेला तर मतदाराचे नेमके ‘संकेत’ त्यांना समजत नाहीत. त्यामुळे त्यांनी आपले स्वागत केले की आपल्याला ‘नारळ’ दिला, असा प्रश्न त्यांना पडतो म्हणे!
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रचारात बऱ्याच अडचणी आहेत. त्यामुळे प्रत्येक उमेदवाराला मतदाराच्या घरी थेट संपर्क करण्याशिवाय दुसरा चांगला पर्याय उरलेला नाही. मग मत मागण्यासाठी उमेदवार मतदारांच्या घरी पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. ‘अतिथी देवो भव:’ ही तर आपली संस्कृती आहे. त्यामुळे उमेदवारांना व कार्यकर्त्यांना चहा घेण्याचा आग्रह बहुतांश ठिकाणी होतोय. चहासाठी थांबल्यावर ‘कपबशी’तून चहा आणला गेला की सहकार पॅनलचे कार्यकर्ते सुखावल्याचे दिसतात. पण त्या ठिकाणी अन्य पॅनलचे उमेदवार कार्यकर्ते असले तर त्यांना तो चहा किती गोड लागतोय? हा संशोधनाचा भाग आहे. किंबहुना कपबशीतील चहा त्यांना चांगलाच गरम लागताना दिसतोय. मग ते चहाचा घोट घेत घेत मतदाराचा चेहरा वाचण्याचा प्रयत्न करतायेत अशी चर्चा आहे.
सध्या गावोगावी कोपरा सभा, जाहीर सभा, पदयात्रा सुरू आहेत. रयत पॅनलच्या प्रचारात वक्त्यांनी चांगली फटकेबाजी केली की, त्याला टाळ्यांबरोबर शिट्टी वाजवून मतदार प्रतिसाद देताना दिसत आहेत. त्यामुळे वातावरण निर्मिती होत आहे. पण हेच जर इतर पॅनलच्या सभेवेळी आजूबाजूला जरी शिट्टी वाजल्याचा आवाज आला तर कार्यकर्त्यांची चुळबूळ पाहायला मिळत आहे.
आता या निवडणुकीत संस्थापक पॅनल पुन्हा एकदा सत्तांतराचा ‘नारळ’ फोडणार का? रयत पॅनल दोन्ही विरोधकांची ‘शिट्टी’ वाजविणार का? मोफत साखरेचा चहा ‘कपबशी’ तून पिताना नेमका कसा लागणार? हे कळायला निकालाची प्रतीक्षा करावी लागणार हे नक्की!
प्रमोद सुकरे, कराड