सफेद, नुकरा अन् अबलख घोडे...
By Admin | Published: February 1, 2016 12:59 AM2016-02-01T00:59:54+5:302016-02-01T00:59:54+5:30
रहिमतपूर : परराज्यातील व्यापारीही दाखल; लाखोंचीे उलाढाल
रहिमतपूर : येथील घोडेबाजारामध्ये राज्यासह परराज्यातीलही व्यापारी, घोडेशौकीन व खरेदीदार यांची वर्दळ वाढली आहे. त्यामुळे लाखोंची उलाढाल होऊ लागली. तसेच बाजारात घोडेसौंदर्य, सजावटीचे साहित्य विक्रीस असल्यामुळे बाजारपेठ फुलून गेली आहे. दरम्यान, बाजारात काटियावाड सफेद घोडे, नुकरा, काळा अबलक, लाल अबलक, संजाब कलर असे घोडे आले आहेत.
सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील माने व रहिमतपूर नगरपरिषदेच्या पदाधिकाऱ्यांशी घोडे व्यापाऱ्यांची सकारात्मक चर्चा झाल्याने अत्यंत कमी वेळेमध्ये नियोजन झाले. त्यानंतर रहिमतपूर शहरात प्रथमच ही घोड्यांची यात्रा भरली आहे.
यावर्षीच्या बाजारात पंजाब, सिंध, धारवाड, राजस्थान, हरियाणा, उत्तरप्रदेश, गुजरात येथून काटियावाड सफेद घोडे, नुकरा, काळा अबलक, लाल अबलक, संजाब कलर, राखाडी, निका तांबडा नाचकाम व लग्नकार्यासाठी लागणारी घोडे आले आहेत. या बाजारात सुमारे २०० घोडे दाखल झाले आहेत. एक ते आठ लाखांपर्यंची घोडी विक्रीसाठी उपलब्ध असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
सुमारे दहा एकराच्या परिसरात नगरपरिषदेने व्यापाऱ्यांना सर्व सुविधा पुरविल्या असल्यामुळे एक शिस्तबद्धपणा या बाजारपेठेला आला आहे.
तसेच बाजारपेठेत खोगीर, रैन, अंधारी, छातीपट्टा आदी साहित्यसुद्धा विक्रीस ठेवल्यामुळे व्यापारी घोडा खरेदी केल्यावर त्याला सजवूनच नेण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहेत. तसेच या व्यापाराला उत्तेजन मिळावे, यासाठी नगरपरिषदेने व्यापाऱ्यांच्यामध्ये व घोड्यांच्या सौंदर्य व नृत्यस्पर्धा सुद्धा आयोजित केल्या आहेत. त्यामुळे एक आगळं-वेगळं रूप बाजारपेठेला आले आहे. यावेळी परिसरातील शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)
घोड्यांच्या लक्षणावर ठरतात दर...
रेसकोर्समध्ये पळविण्यासाठी, काहीजण हौसेसाठी तर काहीजण उपजीविकेचे साधन तर काहीजण पैसे कमविण्याच्या हेतूने घोडे खरेदी करत आहेत. प्रामुख्याने घोड्यांच्या लक्षणांवर व्यापारी दर ठरवत आहेत. या यात्रेच्या माध्यमातून गावातील व्यापार वाढण्यासाठी निश्चित मदत झाली आहे. बहुतांश लहान मुलांचे व नागरिकांचे हे एक आकर्षण केंद्र बनले आहे. भविष्यात शहरामध्ये अशा प्रकारची व्यापारी उलाढाल करणारे प्रकल्प नगपरिषदेने आणल्यास उत्पन्न वाढून शहराचा व परिसराचा विकास होईल, अशी अपेक्षा नागरिकांतून व्यक्त होत आहे.
राज्यातील इतर घोडे बाजाराच्या तुलनेत रहिमतपूरातील हा बाजार व व्यापार वाढविण्यासाठी नगरपरिषदेच्यावतीने सर्व सोयीसुविधा पुरविणार आहे.
-सुनील माने,
जिल्हाध्यक्ष,
राष्ट्रवादी काँग्रेस