ढिसाळ नियोजनामुळे ‘हू आर यू?’
By admin | Published: May 28, 2015 09:56 PM2015-05-28T21:56:49+5:302015-05-29T00:05:40+5:30
शाळा पाहणी दौरा : शिक्षण आयुक्तांनी केंद्र प्रमुखाला खडसावले !
परळी : सातारा तालुक्यातील कुमठे बीट अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या शाळा पाहणी दौऱ्याच्या ढिसाळ नियोजनाचा फटका खुद्द राज्याचे शिक्षण आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनाच बसला. जायचे होते मानेवाडीला मात्र त्यांना नेले शिवाजीनगरला. ही बाब समजताच त्यांच्या गाडीत पाठीमागे असणाऱ्या केंद्र प्रमुखाला आयुक्तांनी हू आर यू? अशी विचारणा केली, अशी चर्चा आता सुरू झाली आहे.
कुमठे बीट अंतर्गत मानेवाडी, कारी अशा बिटमधील सुमारे ४० शाळांच्या पाहणी दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. या दौऱ्यामध्ये राज्याचे शिक्षण आयुक्त पुरुषोत्तम भापकर स्वत: सहभागी झाले होते. त्यांच्याबरोबर शिक्षण सचिव, सर्व संचालक तसेच त्यांची संपूर्ण टीम हजर होती. सकाळी आठ वाजता पाहणी दौऱ्याला प्रारंभ झाला. तत्पूर्वी काही वेळ अगोदर सातारा पंचायत समितीच्या शिक्षण विभागातून एका केंद्र प्रमुखाला अचानकपणे आयुक्तांसमवेत पाहणी दौऱ्यात सहभागी होण्याचे तोंडी आदेश देण्यात आले. नियोजित कार्यक्रमानुसार सर्वप्रथम शिक्षण आयुक्त मानेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेला भेट देणार होते. मात्र त्यांचे शासकीय वाहन पुणे-बेंगलोर महामार्गाने शिवाजीनगरच्या शाळेकडे जावू लागले. शिवाजीनगर काही अंतरावर असतानाच अधिकाऱ्यांचा केंद्रप्रमुखाला फोन आला. पहिली भेट शिवाजीनगरला नव्हे तर मानेवाडी शाळेला द्यायची असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे शिवाजीनगरजवळून पुन्हा वाहनांचा ताफा वळविण्यात आला. यावेळी संतप्त झालेल्या शिक्षण आयुक्तांनी संबंधित केंद्रप्रमुखाला ‘हू आर यू?’ अशा शब्दांत फटकारले.
वाहनांचा ताफा मानेवाडी गावात दाखल झाला. मात्र मानेवाडीची जिल्हा परिषद शाळा नक्की कुठे आहे? हे दौऱ्यामध्ये सहभागी कोणत्याच अधिकाऱ्याला, केंद्रप्रमुखाला माहिती नव्हते. ग्रामस्थांकडे विचारणा करुन शिक्षण आयुक्तांसह त्यांची टिम मानेवाडी शाळेत दाखल झाली. याठिकाणी आयुक्तांनी तब्बल तीन तास वेळ दिला.
दरम्यान, एका केंद्रप्रमुखाने शिक्षण आयुक्तांसह त्यांच्या टिमला सज्जनगडच्याविषयी माहिती दिली. यावर शिक्षण आयुक्त व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी सज्जनगडला भेट देवून तेथील इतिहासाची माहिती घेतली.
दुपारपर्यंत पाहणी दौरा झाल्यानंतर दौऱ्यात सहभागी असलेल्या मान्यवर, अधिकारी यांच्याशी एका शिक्षण संस्थेत भोजनाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, यावेळी जेवण कमी पडले. अनेक अधिकाऱ्यांनी कॅन्टीनमध्ये जेवणाची वेळ आली. त्यामुळे एकूणच शिक्षण आयुक्त दौऱ्याच्या ढिसाळ नियोजनाची चर्चा आता शिक्षण विभागासह सर्वत्र रंगू लागली आहे. (वार्ताहर)
आयुक्तांच्या अगोदर जेवणावर ताव!
शिक्षण आयुक्त शाळा पाहणी करण्यास येणार म्हणून साताऱ्यातील एका संस्थेत सर्व अधिकारी, मान्यवरांची भोजनाची उत्तमप्रकारे सोय करण्यात आली होती. त्यावेळी येथील शिक्षक, कर्मचारी व अधिकाऱ्यांनी शिक्षण आयुक्त, शिक्षणाधिकारी येण्याच्या अगोदर जेवणावर ताव मारला. यामुळे जेवण कमी पडले. याचीही आता खुमासदार चर्चा सुरू आहे.