कुणी नोटा घेता का नोटा?

By admin | Published: November 9, 2016 11:18 PM2016-11-09T23:18:37+5:302016-11-09T23:20:54+5:30

हिरवी पत्ती हसली... गुलाबी पत्ती रुसली : बाजार पेठांमध्ये शुकशुकाट; गबरगंड उमेदवारांची पाचावर धारण

Who does not take notes? | कुणी नोटा घेता का नोटा?

कुणी नोटा घेता का नोटा?

Next

सातारा : खिशात हिरव्या, गुलाबी नोटांचा गट्टा असूनही चिल्लरसाठी वणवण फिरणाऱ्या साताररकरांना ‘असुनी नाथ... मी अनाथ !’ काव्याची आठवण झाली. बाजारपेठेत धंदा जोरात झाला; पण व्यापाऱ्यांचा गल्ला रिकामाच राहिला. ऐन निवडणुकीच्या तोंडावर हे कागदी गठ्ठे ‘अर्थ’हीन झाल्याने गरीब-श्रीमंत उमेदवार एकाच पातळीवर येऊन उभे ठाकले. बुधवारी सातारा जिल्ह्याच्या बाजारपेठेत ‘कुणी नोटा घेता का नोटा?’ हाच प्रश्न साऱ्यांना सतावत राहिला.
सुटे पैसे असतील तरच प्रवास...
एसटीच्या काही प्रवाशांनाही बुधवारी केवळ सुटे पैसे नसल्याने प्रवास करता आला नाही. अनेक प्रवाशांनी पाचशे, हजारांच्या नोटा काढल्याने वाहकाला सर्वांना सुटे पैसे देणे शक्य नसल्याने प्रवासी आणि वाहकामध्ये वाद निर्माण होत होता. त्यामुळे वाहकांनी एसटी बस सुरू होण्याआदीच प्रवाशांना सूचना देत होते की, ‘सुटे पैसे असतील तरच प्रवास करा; अन्यथा तिकिटामागे उरलेले पैसे लिहून नंतर ते ज्या त्या डेपोतील कार्यालयातून आपापल्या जबाबदारीवर राहिलेले पैसे घ्यावे,’ अशी विनंतीवजा सूचना दिल्याने अनेक प्रवाशांनी प्रवास करणेच टाळले.
नोटांवर फक्त बुकींग,
धनादेशाची चलती...
पाचशे, हजारांच्या नोटा चलनात बंद झाल्याने बुधवारी साताऱ्यात हजारो रुपयातील व्यवहार ठप्प झाले, यातून मार्ग काढण्यासाठी काही व्यावसायिकांनी जुन्या पाचशे, हजार रुपयांच्या नोटांवर वस्तूची बुकींग करून घेतली व दोन दिवसांत या नोटा बँकातून बदलून आणल्यावर ती वस्तू ग्राहकांना देण्यात येणार असल्याचे सांगितले. त्यामुळे खास करून सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकाला किमान दोन दिवसांचा दिलासा मिळाला आहे. नेहमीपेक्षा सोने खरेदीसाठी बुधवारी गर्दी कमी असली तरी ग्राहकांना सोने खरेदी करता यावे, यासाठी पाचशे, हजारांच्या नोटांवर बुकींग तर चेक, क्रेडिट कार्ड याद्वारे खरेदी करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली असल्याचे सराफी व्यावसायिक मोतीलाल जैन यांनी सांगितले.
कर भरतोय मग भीती कसली...
काळा पैसा काढण्यासाठीच मोदी सरकारनं पाचशे, हजारांच्या चलनातील नोटा अचानक बंद केल्या आहेत. त्यामुळे बुधवारी बाजारपेठेत पाचशे, हजारांच्या नोटा अनेक दुकानांत नाकारल्या गेल्या असल्या तरी सकाळपासून आमच्या दुकानात याच नोटा स्वीकारून वस्तूंची विक्री केली आहे. शासनाच्या नियमानुसार सर्व कर वेळेत भरत असल्याने या नोटांना ग्राहकांकडून घेण्यास काहीच हरकत नाही, असे दुकानदार भारत रोहिरा यांनी सांगितले.
उमेदवारांची भलतीच पंचाईत...
पालिका निवडणुकांमध्ये पाचशे ते हजारांच्या नोटेत एका मताचे काम होत होते; पण आता देण्यासाठी आणलेल्या नोटाच खोट्या झाल्याने मतदारांना काय द्यायचे? या बुचकुळ्यात अनेक उमेदवार पडले आहेत. नोटांऐवजी काही गिफ्ट देता येईल, असे पर्याय कार्यकर्ते सुचविताना दिसत आहेत. पण हे गिफ्ट खरेदी करण्यासाठी तरी या नोटा कुठे चालणार?
दुधाचे पैसे उधारीवर !
रात्री नोटा बंद झाल्याचे समजताच पहाटे हॉटेल आणि दुकानावर दुधाच्या पिशव्या टाकणाऱ्या व्यावसायिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागला. सकाळी सर्वत्र दुधाच्या पिशव्या त्यांनी टाकल्या; परंतु सकाळी दहा वाजता वसुलीस सुरुवात केल्यानंतर अनेक दुकानदारांनी पाचशे अन् हजारांच्या नोटा देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे दुधाच्या पिशव्या टाकणाऱ्या व्यावसायिकांनी दोन दिवस उधारी ठेवा; परंतु ‘आता पैसे नको रे बाबा,’ अशी भूमिका घेतल्याचे शहरात पाहायला मिळाले.
आज
या नोटानं रडवलं !
एका ग्रामीण भागातून आई आणि मुलगी काही कामानिमित्त बुधवारी साताऱ्यात आल्या होत्या. आईच्या हातात पाचशे रुपयांची नोट होती. त्या मायलेकी दोघी प्रत्येक दुकानदाराकडे जाऊन पैसे सुटे करून मागत होते. मात्र, त्यांना कोणीच दिले नाहीत. रात्री हा नोटा बंदचा निर्णय झाला. त्यांना माहितीही नव्हते. आता सुटे पैसे कोणी दिले नाही तर परत घरी जाणार कसे, असा प्रश्न त्यांना पडला. मात्र, एका व्यक्तीला त्यांची दया आली. त्यामुळे त्यांनी पाचशे रुपये सुटे दिले. काबाडकष्ट केल्यानंतर कधी तरी आमच्या हातात पाचशेची नोट यायची; मात्र आज याच नोटानं मला रडवलं,’ अशी भावनिक प्रतिक्रिया त्या आईने दिली.
साहित्य कमी घ्या..पण शंभर रुपये द्या !

नेहमी खरेदीसाठी गर्दी असलेल्या किराणा मालाच्या दुकानामध्ये आज वेगळेच चित्र पाहायला मिळाले. महिनाभराचा किराणा भरणाऱ्या लोकांची पंचायत झाली. तीन ते चार हजार बील झाल्यामुळे एवढे सुटे पैसे आणायचे कुठून, असा आ वासून प्रश्न उभा राहिला. दुकानदार ओळखीचा असला तरी त्याच्याकडून कसलाच प्रतिसाद मिळत नव्हता. साहित्य कमी घ्या..पण शंभर रुपयांच्याच नोटा द्या, असा आग्रह दुकानदाराने घेतला होता. त्यामुळे महिनाभराचा किराणा घेण्याऐवजी केवळ एका आठवड्याचा किराणा माल घेऊन नागरिक घरी परतत होते.
ज्या घरांमध्ये पूर्व नियोजित कार्यक्रम ठरले होते, त्या घरांमध्ये पाचशे, हजार नोटांच्या बंदीमुळे भलतीच गोची झाली आहे. शहरातील एका ग्रुपने महिन्या आधीपासून गेट टू गेदर करण्याचे ठरविले होते. त्यानुसार स्थळ वेळ सगळे निश्चित केले होते. त्याची अनामत रक्कमही त्यांनी हॉटेलकडे भरली होती. मंगळवारी रात्री मात्र पतंप्रधान

Web Title: Who does not take notes?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.