नगराध्यक्षपदी कोणाची वर्णी?
By admin | Published: January 29, 2015 09:39 PM2015-01-29T21:39:01+5:302015-01-29T23:36:03+5:30
संबंधितांवर दोन्हीही पक्षांनी शिस्तभंगाची कारवाई मात्र अद्यापही केलेली नाही.
म्हसवड/कुकुडवाड : म्हसवड पालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीचे वेध पालिकेतील सत्ताधारी काँगे्रस पक्षास लागून राहिले आहे. विजय सिन्हा यांनी बुधवारी जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्याकडे नगराध्यक्षपदाचा राजीनामा सुपूर्द केला. त्यामुळे नगराध्यक्षपद रिक्त झाले आहे.आमदार जयकुमार गोरे यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली पालिकेत काँग्रेस पक्षाची सत्ता आहे. पालिकेची एकूण सदस्य संख्या १९ आहे. यामध्ये दोन स्वीकृत सदस्यांचा समावेश आहे. सभागृहात काँग्रेस १६ व राष्ट्रवादी काँग्रेस तीन असे संख्या बलाबल आहे.नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेस पक्षाचे दोन व राष्ट्रवादी एक अशा तीन नगरसेवकांनी बंडखोरीचा पवित्रा घेतला होता. संबंधितांवर दोन्हीही पक्षांनी शिस्तभंगाची कारवाई मात्र अद्यापही केलेली नाही. पालिकेचे नगराध्यक्ष पहिल्या अडीच वर्षांच्या कालखंडासाठी अनुसूचित जातीच्या महिलासाठी राखीव होते. सत्ताधारी गटातील वैशाली लोखंडे व प्रतिमा लोखंडे या दोन सदस्यांना विभागून नगराध्यक्षपदाची संधी देण्यात आली होती. दुसऱ्या टप्प्यात नगराध्यक्षपद सर्वसाधारण गटातील पुरुषासाठी राखीव आहे. त्याचा लाभ सर्वप्रथम विजय सिन्हा यांना देण्यात आला.
नगराध्यक्षपदाचा लाभ अनेकांना मिळावा या हेतूने अडीच वर्षांच्या कालखंडात प्रत्येकी सहा महिन्यांचा कालावधी विभागून देऊन चार सदस्यांना नगराध्यक्षपदी संधी देण्याचा मानस आमदार जयकुमार गोरे यांचा आहे. (वार्ताहर)
पाच उमेदवारांची मोर्चेबांधणी सुरू
नितीन दोशी, विजय धट, सुरेश म्हेत्रे, मारुती वीरकर, निर्मला पिसे यांना नगराध्यक्षपदाची संधी मिळण्याची शक्यता आहे. नितीन दोशी हे आमदार गोरे यांचे विश्वासू मानले जातात. अल्पसंख्यांक जैनधर्मियांना नगराध्यक्षपदाची संधी गेली साठ वर्षे मिळालेली नाही. यामुळे नितीन दोशी यांना आता प्रथम पसंती असेल. आमदार जयकुमार गोरे त्यांनाच नगराध्यक्षपदाचा उमेदवारी अर्ज भरण्याची संधी देतील, अशी राजकीय वर्तुळात चर्चा असून इच्छुकांनी नगराध्यक्षपदासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.