ऐतिहासिक राजवाडा पोखरतंय कोण?

By Admin | Published: December 7, 2015 10:15 PM2015-12-07T22:15:18+5:302015-12-08T00:31:44+5:30

दुर्लक्षामुळे अवकळा : तांब्याचे पाइप, लोखंडी गज, लाकूडफाट्यावर चोरट्यांनी केला हात साफ--झूम लेन्स...

Who is the historic palace? | ऐतिहासिक राजवाडा पोखरतंय कोण?

ऐतिहासिक राजवाडा पोखरतंय कोण?

googlenewsNext

राजीव मुळ्ये --सातारा  --मराठ्यांची राजधानी असलेल्या साताऱ्यातील ऐतिहासिक राजवाडा चोरट्यांनी चक्क पोखरला आहे. मुख्य दरवाज्यांना कुलपे लावली असली तरी ‘चोरवाटा’ खुल्या आहेत. वैभवशाली इतिहासाची साक्ष देणारी ही वास्तू देखभालीअभावी केविलवाणी झाली असून, या वास्तूत नेमके काय करायचे याबाबतचा निर्णय वर्षानुवर्षे अधांतरी राहिल्याने ‘इतिहास संशोधनाचे दृश्य साधन’ मानली गेलेली येथील भित्तिचित्रेही लयाला जाण्याच्या वाटेवर आहेत. राजवाडा इमारतीला दोन मुख्य दरवाजे असून, दोन्ही ठिकाणी कुलूप आहे. परंतु तरीही या तीनमजली वास्तूतील कोणत्याही दालनात सहज जाता येते. या वास्तूत न्यायालय आणि सरकारी कार्यालये होती, तोपर्यंत देखभालीचा प्रश्न नव्हता. परंतु काही वर्षांपूर्वी आधी न्यायालय आणि नंतर सरकारी कार्यालये स्थलांतरित झाली आणि राजवाड्याची रया जाण्यास सुरुवात झाली. प्राप्त माहितीनुसार, न्यायालय आणि कार्यालयांसाठी ही इमारत राजघराण्याकडून सरकारने भाडेपट्ट्याने घेतली असून, देखभालीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. कार्यालये स्थलांतरित झाल्यानंतर या इमारतीचा ताबा आणि विनियोग याबाबत बरेच मंथन झाले; मात्र अद्याप निष्पन्न काहीच झालेले नाही आणि ही इमारत इतिहास जोपासणाऱ्या देखभालकर्त्याची प्रतीक्षा करीत आहे.
राजवाड्याची दर्शनी इमारत तीनमजली असून, आत गेल्यावर एक चौक आणि प्रचंड मोठा ‘दरबार हॉल’ आहे. त्याच्या दोन्ही बाजूस दुमजली इमारती असून, मराठा पद्धतीच्या कोरीव लाकूडकामाने घडविलेली असंख्य दालने आहेत. दरबार हॉलच्या तीन बाजूंना बांधीव दगडी कारंजी असून, पाणी खेळविणारे जुने तांब्याचे किमती पाइप आज दिसत नाहीत. जवळच अशोक आणि अन्य झाडे लावलेली आहेत. त्यातील बारा झाडे आज दिसतात; मात्र पुढील चौकातील गुलमोहोराची झाडे दिसत नाहीत. तोडून ठेवलेल्या लाकडाचे काही ओंडके इमारतीत काही ठिकाणी दिसतात. जुन्या कोरीव लाकडाचे तुकडेही काही ठिकाणी विखुरले आहे.


मराठा चित्रशैली जपणे गरजेचे
इतर राज्यांप्रमाणेच महाराष्ट्रालाही चित्रकलेची समृद्ध परंपरा आहे. या कलेची निर्मिती उत्तर पेशवाईपर्यंत होत होती. साताच्या राजवाड्यात कुस्ती खेळणारे मल्ल, हत्ती-घोड्यांवरून लढाईचे दृश्य याबरोबरच पौराणिक प्रसंगही रंगविण्यात आले आहेत. नैसर्गिक रंगात काढलेली ही चित्रे केवळ कला म्हणून नव्हे, तर इतिहासाच्या अभ्यासाचे साधन म्हणून जपणे आवश्यक असल्याचे इतिहासतज्ज्ञांचे म्हणणे आहे. या चित्रांत तत्कालीन पेहराव, रूढी-परंपरा, वापराच्या वस्तू अशा बाबी थेट पाहता येतात; मात्र राजवाड्यातील चित्रे आजमितीस लयाला जाण्याच्या वाटेवर आहेत. राजवाडा इमारतीतील एक दालन मराठा आर्ट गॅलरीला देण्यात आले होते. या दालनाला आता कुलूप आहे; पण तरीही आत जाता येते, हे धक्कादायक वास्तव!


मराठा चित्रकला ही स्वतंत्र शैली असून, केवळ राजवाड्यातच नव्हे तर वाई आणि आसपासच्या ठिकाणी अनेक वाडे, घरे आणि मंदिरांमध्ये या शैलीतील चित्रे दिसतात. पांढऱ्या पार्श्वभूमीवरील ही चित्रे कलावंतांनी स्वत: तयार केलेल्या रंगात रंगविली आहेत. हा एक चित्ररूप इतिहासच असून, त्या-त्या काळाची थेट माहिती देणारी ही चित्रे केवळ कला म्हणून नव्हे, तर अभ्याससाधने म्हणून जपली पाहिजेत.
- डॉ. श्रीकांत प्रधान,
भित्तिचित्रांचे अभ्यासक, पुणे

अतिदुर्मिळ लाकूडकाम
राजवाड्यातील लाकूडकाम अत्यंत दुर्मिळ असून, महिरपींच्या दोन्ही बाजूंना केळफूल कोरण्याची खास मराठा शैली यात आढळते. वरील मजल्यावर काही दालनांमध्ये प्रवेश करताच अर्धवर्तुळाकार कोरीव छत दिसते आणि त्यानुरूप खालचे लाकूडकाम केले आहे. या महिरपी अत्यंत किमती असल्याने त्यांच्या संरक्षणाची खास व्यवस्था असणे आवश्यक आहे. काही ठिकाणी कोरीव भाग तोडून चोरट्यांनी पळवल्याचे पूर्वीच स्पष्ट झाले होते; मात्र तरीही संवर्धनासाठी प्रयत्न दिसत नाहीत.


जुन्या, अचूक तंत्रज्ञानाचा पुरावा
राजवाड्यातील दगडी कारंजी हा जुन्या तंत्रज्ञानाचा एक उत्कृष्ट पुरावा आहे. या आवारात न्यायालय होते, तेव्हा अनेकजण या तंत्रज्ञानाचा थेट अनुभव घेत होते. दगडी जलसाठ्यात पाणी नसले, तरी एखाद्या कारंज्यात फुंकर मारली की दुसऱ्या कारंज्यातून पाणी बाहेर येत असे. राजवाड्याचा परिसर थंड ठेवण्यासाठी ही रचना होती. कारंज्यांची तोंडे चुन्याची होती. त्यांना चुनागच्ची कारंजी असे म्हणत. अंतर्गत जलवाहिन्या तांब्याच्या होत्या. आता त्या गायब आहेत.

Web Title: Who is the historic palace?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.