माढ्याच्या रणांगणात सरशी कोणाची? निकालाबाबत उत्सुकता : प्रमुख उमेदवारांकडून विजयाचे दावे
By admin | Published: May 15, 2014 11:31 PM2014-05-15T23:31:46+5:302014-05-15T23:37:50+5:30
माढा : काँग्रेस आघाडीमधील सुंदोपसुंदी, भाऊबंदकी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना, अपक्ष उमेदवार प्रतापसिंह मोहिते - पाटील यांच्या आक्रमक
माढा : काँग्रेस आघाडीमधील सुंदोपसुंदी, भाऊबंदकी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना, अपक्ष उमेदवार प्रतापसिंह मोहिते - पाटील यांच्या आक्रमक प्रचारामुळे माढ्याचे ‘रण’ लक्षवेधक ठरले. या रणांगणातील तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार? याबाबत सोलापूर जिल्ह्यात कमालीची उत्सुकता आहे. लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजायला लागल्यापासूनच शरद पवारांनी सर केलेला माढा मतदारसंघ राष्टÑवादी काँग्रेसच्या उमेदवारीवरून चर्चेत आला. जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष संजय शिंदे या मतदारसंघात प्रयत्नशील होते; पण विजयसिंहांचे ज्येष्ठत्व, त्यांच्या पुनर्वसनाला प्राधान्य आणि विजयाचे गणित मांडून शिंदे यांना डावलून मोहिते-पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. तत्पूर्वी त्यांचे धाकटे बंधू आणि माजी मंत्री प्रतापसिंह मोहिते - पाटील यांनी लोकसभा निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केल्यामुळे मोहिते -पाटील घराण्यातील भाऊबंदकी पुन्हा चव्हाट्यावर आली अन् या मतदारसंघाचे राज्याचे लक्ष वेधले. विजयसिंह यांना प्रचाराच्या प्रारंभीच्या काळातच काँग्रेस आघाडीमधील उभ्या दाव्याला सामोरे जावे लागले. महायुतीकडून लढणार्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सदाभाऊ खोत आणि अपक्ष उमेदवार प्रतापसिंह मोहिते - पाटील यांनी मतदारसंघात मुद्यांवर आधारित प्रचार केला. प्रतापसिंह हे आपल्या ज्येष्ठ बंधूवर थेट हल्ले चढवित असल्यामुळे त्यांच्या प्रचारसंभांना चांगला प्रतिसाद मिळाला. खोत यांनी ग्रामीण मतदारांना आकर्षित करणार्या शैलीत शेतकर्यांचे प्रश्न मांडून प्रचारसभा गाजविल्या. शिवाय त्यांच्यासाठी भाजपच्या प्रमुख नेत्यांनी आवर्जुन सभा घेऊन लढत अधिकच लक्षवेधी केली. राष्टÑवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासाठी माढा हा प्रतिष्ठेचा मतदारसंघ असल्यामुळे त्यांनी जातीने या मतदारसंघात लक्ष घातले होते. टेंभूर्णी, सांगोला, करमाळा आणि फलटणमध्ये पवारांनी सभा घेऊन विजयसिंहांना विजयी करण्याचे आवाहन केले. अजित पवारांनी निवडणूक प्रचार काळात परदेशस्थ असलेल्या संजय शिंदे यांना फटकारल्यामुळे त्यांचीही सभा गाजली. काँग्रेस आघाडी, महायुती आणि प्रतापसिंहांसह मतदारसंघात बहुजन समाज पक्षाचे कुंदन बनसोडे, हिंदू प्रजा पक्षाचे नवनाथ पाटील, ‘आप’च्या सविता शिंदे, तृणमूल काँग्रेसचे सुरेश घाडगे हे नशीब आजमावित आहेत. (प्रतिनिधी)