कोण म्हणतं महाबळेश्वरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:42 AM2021-09-26T04:42:01+5:302021-09-26T04:42:01+5:30

संडे स्टोरी सचिन काकडे सह्याद्रीच्या उंचचउंच डोंगरांगा, घनदाट अरण्य, चार महिने धोधो कोसळणारा पाऊस, डोंगरातून वाहणारे पाण्याचे सुंदर धबधबे, ...

Who says in Mahabaleshwar | कोण म्हणतं महाबळेश्वरात

कोण म्हणतं महाबळेश्वरात

Next

संडे स्टोरी

सचिन काकडे

सह्याद्रीच्या उंचचउंच डोंगरांगा, घनदाट अरण्य, चार महिने धोधो कोसळणारा पाऊस, डोंगरातून वाहणारे पाण्याचे सुंदर धबधबे, अंगाला बोचणारी गुलाबी थंडी, ब्रिटिशकालीन पॉईंट, मंदिरे आणि अर्थातच येथील रसाळ स्ट्रॉबेरी अशी महाबळेश्वरची ठळक ओळख. या विविधतेमुळेच या पर्यटनस्थळाची नोंद आज जगाच्या पटलावर झाली आहे. येथील निसर्ग सौंदर्य पर्यटकांना नेहमीच भुरळ घालत असते. म्हणूनच वर्षभरात जगभरातील लाखो पर्यटक या सौंदर्यनगरीला भेट देत असतात. अशा पर्यटकांसाठी महाबळेश्वर हे ‘१२ पॉर्इंट आणि दोन मंदिर’ एवढ्यापुरतंच मर्यादित आहे. मात्र, याही पलिकडं एक असं महाबळेश्वर आहे जे आपण ना lकधी पाहिलं ना कधी अनुभवलं. स्थानिकांनी पर्यावरणाचा विचार करून जगापासून सुरक्षित ठेवलेला हा ठेवा महाबळेश्वरच्या सौंदर्यात आणखीणच भर घालत आहे.

महाबळेश्वरातील कास :

महाबळेश्वरपासून पाच किलोमीटर अंतरावर माचूतर गावाजवळ गणेश मंदिर आहे. या मंदिराच्या मागे प्लॅटो पॉईंट असून येथील पठारावर पावसाळ्यानंतर विविधरंगी फुलांना बहर येतो. कास पठारावर उमलणारी अनेक फुले इथे पहायला मिळतात.

शिवकालीन पूल :

छत्रपती शिवाजी महाराज यांनी प्रतापगडजवळील पार या गावात कोयना नदीवर पुलाचे बांधकाम केले. काळ्या काताळातील हा पूल साडे तीनशे वर्षांपासून आजही अभेद्य आहे. ५२ मीटर लांब, १५ मीटर उंच व आठ मीटर रुंदीच्या पुलाचा प्रत्येक दगड काटकोनात घडवलेला आहे. हा पूल आजही शिवकालाची साक्ष देत उभा आहे.

सर जॉन माल्कम यांचा बंगला :

ब्रिटिश गव्हर्नर सर जॉन माल्कम यांनी महाबळेश्वरची बाजारपेठ वसविले असे सांगितले जाते. त्यांचा माऊंट माल्कम हा बंगला शहरातील सर्वात उंच टेवडीवर वसला आहे. या बंगल्यातून संपूर्ण शहर एका नजरेत सामावून घेता येते. हेरीटेजमध्ये समाविष्ट झालेली ही वास्तू आता अखेरची घटका मोजू लागली आहे.

ब्रिटिशकालीन चर्च :

महाबळेश्वरमधील राणीची बाग प्रसिद्ध आहे. या बागेच्या वरच्या बाजूला घटदाट जंगलात लपलेलं ब्रिटिशकालीन चर्च ही वास्तू अत्यंत देखणी असून, ती सुस्थितीत आहे. संपूर्ण दगडी बांधकाम असलेली ही इमारत पर्यटकांपासून आजही कोसो दूर आहे.

चायनामन वॉटरफॉल

महाबळेश्वर शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या मुन्नवर सोसयटीजवळ चायनामन वॉटरफॉल आहे. येथील जलप्रपात आजवर पर्यटकांच्या दृष्टिक्षेपात कधीही पडलेला नाही. पावसाळ्यात चार-पाच टप्प्यात कोसळणारा हा धबधबा पाहताना ट्रेकिंंगचा थरारही अनुभवता येतो.

बाजारपेठेतील ‘लायब्ररी’ :

बसस्थानकापासून हाकेच्या अंतरावर असलेले ब्रिटिशकालीन ग्रंथालय अन् या ग्रंथालयाची इमारत अत्यंत देखणी आहे. या ग्रंथालयात दीडशे ते दोनशे वर्षांपूर्वीच्या पुस्तकांचा ठेवा, ब्रिटिशकालीन कपाटे, खुर्च्या असे साहित्य पहायला मिळते. स्थानिक नागरिक या ग्रंथालयाला ‘लायब्ररी’ असेच संबोधतात.

सोबत फोटो :

Web Title: Who says in Mahabaleshwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.